ठाणे : कोरोना बाधित रुग्णांचे संख्या वाढत आहे, यामुळे घाबरुन जाऊ नका, मृत्यूदर कसा कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करा. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करा, कनंटेन्मेट झोनची प्रभावीपणे अंमलबाजवणी करा, कोरोना बाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या आरोग्य सेवेच्या ठिकाणी आवश्यक तो स्टाफ पुरवा, औषधोपचार वेळेत मिळावा, यासाठी प्रयत्न करा, याशिवाय रोजच्या स्क्रिनिंगचे प्रमाण वाढवा, अशा महत्वाच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लवकुमार अग्रवाल यांनी दिल्या आहेत.
शनिवारी सकाळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या उपस्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांच्या अधिपत्याखालील पथकाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी होते याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रलयाचे सह सचिव आणि स्मार्ट सिटी मिशन डायरेक्टर कुणाल कुमार, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, केंद्रीय संचालक(आरोग्य) डॉ. ई. रविंद्रन आदीं उपस्थित होते.
यावेळी त्यांनी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतेय म्हणून घाबरुन जाऊ नका, या उलट मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न करा, अशा महत्वाची सूचना दिली. वयोवृद्धांबरोबर ज्यांना कोरोनाची अधिकची लक्षणे दिसत असतील त्यांना आधी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन द्या, रोजची जी स्क्रिनिंग केली जाते, त्याची संख्या वाढवा, तपासणीची संख्या वाढवा असेही त्यांनी सांगितले. मृत्यूदर कमी कसा करता येईल, त्यासाठी काय काय प्रयत्न करणे गरजेचे आहे, याचा विचार करा. कोरोनाशी लढा देताना नागरिकांना विश्वासात घ्या, जनजागृती करा, कनंटेन्मेट झोनमधील निबंर्ध कडक करा असेही त्यांनी सांगितले.
कंटनेमेंट झोनमधील नागरीक बाहेर जाणे, बाहेरचा नागरीक आत येणे हे फार चुकीचे आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमांची कठोर अंमलबजावणी करा अशा सुचनाही त्यांनी दिल्या. प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचा जे काही आपण करीत आहोत, ते तुमच्यासाठी करीत आहोत, हे नागरिकांना समजावून सांगा असेही त्यांनी सांगितले. शहरातील लॅब आणि प्रशासन, किंवा आरोग्य यंत्रणोने समन्वय ठेवणो गरजेचे आहे. जेणे करुन रुग्णांची माहिती मिळून त्या रुग्णांना वेळेत उपचार मिळणे शक्य होईल यासाठी प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुरूवातीस केंद्रीय पथकाने मुंब्रा येथील अमृतनगर, इन्शानगर येथील प्रतिबंधित लोकांची पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बाळकूम साकेत येथील 1 हजार बेडचे ठाणे कोविड हॉस्पिटलची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पाहणी दौरा झाल्यानंतर केंद्रीय पथकाने महापालिका मुख्यालयामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांचा आढावा घेतला.
सुरूवातीस ठाणे महापालिकेचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने ठाणो जिल्हा, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर आदी महापालिकेचाही आढावा घेतला. यावेळी ठाणे पोलिस सह आयुक्त डॉ. मेखला, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी, मीरा भायंदर महापालिकेचे आयुक्त डॉ. राठोड, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त दयानिधी आदी उपस्थित होते.
- राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यावेळी क्वारंटाईन सुविधा वाढविणे, मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखणे, मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविणे यावर लक्ष देण्याची आवश्यकता बोलून दाखिवली.