लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करीत सर्रास वाहनांमधून जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या तब्बल एक हजार ५५३ दुचाकीस्वारांसह एक हजार ९४१ वाहन चालकांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली आहे. या चालकांकडून नऊ लाख ७० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभगातील १८ युनिटच्या निरीक्षकांनी २८ जून रोजी एकाच दिवसात ही कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतांनाच नागरिकांनीही सोशल डिस्टसिंगचे नियम पाळण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. तरीही सर्रास दुचाकीवरुन डबल सीट, रिक्षांमध्येही दोन पेक्षा जास्त तसेच मोटार कार आणि कॅबमध्येही दोन पेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होत असल्याची माहिती उपायुक्त काळे यांना मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार कळवा युनिटने सर्वाधिक १८६ दुचाकींवर, अंबरनाथ युनिटने सर्वाधिक २७ रिक्षांवर तर कोनगाव युनिटने सर्वाधिक ३५ मोटारकारमधून जादा प्रवाशांची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केली. संपूर्ण आयुक्तालयात अशा एक हजार ५५३ दुचाकी, १६६ रिक्षा तर २२२ मोटारकार वर कारवाई केली. या प्रत्येक वाहन चालकांकडून पाचशे रुपये दंड वसूल केला असून काहींचा ई चलनाद्वारे दंड आकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी घरी राहणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे कडक नाकाबंदी केली आहे. अनावश्यक आणि जादा प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार आहे.अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर