लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाची तपासणी करण्यासाठी जाणाºया भास्कर कॉलनीतील एका ५९ वर्षीय महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळालेल्या दोन १७ वर्षीय तरुणांना नौपाडा पोलिसांनी बुधवारी अवघ्या ४८ तासांमध्ये अटक केली. त्यांच्याकडून जबरी चोरीतील दोन तोळयांची सोनसाखळी, चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि मोबाइल असा सुमारे दीड लाखांचा ऐवजही जप्त केला आहे.नौपाड्यातील भास्कर कॉलनी परिसरात राहणारी ही महिला तिच्या पतीसह २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कोरोनाची तपासणी करण्यासाठी मिलेनियम लॅब येथे जात होती. ते होरायझन रुग्णालयाच्या गेटसमोरील रस्त्याने जात होते. त्याचवेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांचे ८५ हजारांचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून तिथून पलायन केले. कोरोना तपासणीत पती पॉझिटिव्ह आले. तर या महिलेला कॉरंटाईन करण्यात आले. त्यामुळे केवळ फोनवरुन २२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास या महिलेने या जबरी चोरीची तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फूटेज आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संबंधित मोटारसायकल आणि चोरटयांचे वर्णन पोलिसांना मिळाले. जबरी चोरी करणारे दोन्ही अल्पवयीन असून ते तीन हात नाका येथील गुरुद्वाराजवय येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक विनोद लबडे यांना मिळाली. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लबडे, जमादार सुनिल अहिरे, पोलीस नाईक सुनिल राठोड, साहेबराव पाटील, संजय चव्हाण आणि विकास चनचडकर आदींच्या पथकाने या दोघांनाही २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन तोळयांचे मंगळसूत्र आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. त्यांना ६ आॅक्टोबरपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश भिवंडीच्या बाल न्यायालयाने दिले आहेत.