जितेंद्र कालेकर
ठाणे : लॉकडाउनमुळे इंदूर येथे अडकून पडलेल्या दोघा तरुणांनी आईवडिलांच्या भेटीसाठी चक्क पायी मुंबई गाठली. तब्बल नऊ दिवस रस्ता तुडवल्यानंतर शनिवारी ते ठाण्यात पोहोचले. दोन दिवसांपासून अन्नाचा कणही पोटात नसलेल्या या तरुणांना पोलिसांनी दोन घास देऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले.
मूळचे विक्रोळी येथील अमोल सावंत (३२) व दिनेश पवार (२५) (नावे बदलली आहेत) हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून मध्य प्रदेशातील इंदूर येथे रंगारी काम करतात. ज्या ठिकाणी ते गेले होते, तेथील मालकाने त्यांना मार्च महिन्याचा पगार दिला. नंतर त्यांना घरी जाण्यास सांगितले. गेला महिनाभर कसाबसा काढल्यानंतर या दोघांनीही मुंबईकडे पायी जाण्याचा निर्णय घेतला. २४ एप्रिलला इंदूरवरून निघालेले ते नऊ दिवसांनी ठाण्यात कॅडबरी जंक्शनजवळ पोहोचले. तेथे नाकाबंदीमध्ये या दोघांचीही पोलीस उपनिरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने चौकशी केली. नऊ दिवसांच्या पायी प्रवासाची कहाणी त्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. दोन दिवसांपासून अन्नाचा कणही मिळाला नसल्यामुळे पाटील यांनी त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली दोन जेवणाची पाकिटे व पाणी दिले. इंदूर ते ठाणे या प्रवासातही असेच मिळेल ते खाल्ले. विक्रोळीतील घरी आई, वडील असून त्यांच्यासाठीच आम्ही मुंबईकडे धाव घेतल्याचे त्यांनी सांगितले.८०० किलोमीटर अंतर कापलेरोज ५0 ते ६0 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर एखाद्या वस्तीजवळ किंवा रस्त्याच्या कडेलाच ते काही तासांचा मुक्काम करत. एखादे वाहन दिसले तर त्याला थांबण्याची विनंती करायची, मग ते नेईल तेवढे अंतर जाऊन पुन्हा पायी प्रवास करायचा. सलग नऊ दिवसांच्या ८00 किलोमीटरच्या प्रवासानंतर ते २ मे रोजी ठाण्यात पोहोचले.