ठाणे : कोरोना रुग्ण वाढत असल्याने ठाणे महापालिका मुख्यालयासह प्रभाग समितीमध्ये गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक काम असेल तरच परवानगी घेऊन पालिकेत प्रवेश दिला जाणार आहे. महापालिकेच्या सेवेत कामाला असलेल्या ५५ वर्षांवरील व्यक्तींसाठीदेखील नियमावली तयार करण्यात आली असून, त्यांना आळीपाळीने कामावर बोलावले जाणार आहे.
गुरुवारी ठाण्यात कोरोनाचे ९९० नवे रुग्ण आढळल्याने पालिकेने कठोर निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी पालिकेच्या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांच्या कामासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय टपाल प्रवेशद्वारावरच स्वीकारले जाणार आहे. लोकशाही दिन, मुख्यालय दिन रद्द करण्यात आले आहेत. नागरीकांनी देयके ऑनलाइन भरावीत, असेही पालिकेने स्पष्ट केले.