ठाणे - ठाणे महापालिका क्षेत्रात रोज पाच हजारांंहून अधिक कोरोना चाचण्या होत असून त्यामध्ये गेल्या १५ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण चार टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळेच शहरात सध्या तरी कोरोनाचा समूहसंसर्ग नसल्याचा दावा महापालिकेने केले आहे. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत मृत्युदर सर्वात कमी असून तो १.२० टक्क्यांच्या आसपास आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांंनुसार सलग १५ दिवस कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर शहरात समूहसंसर्ग असतो, त्यानुसार पालिकेने हा दावा केला आहे.महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत ४५ हजार ७३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४२ हजार २३२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर, दोन हजार १६१ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत एक हजार १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून दररोज पाच हजारांहून अधिक कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून १५० ते २०० रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण चार टक्क्यांपेक्षा कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार सलग १५ दिवस रुग्ण आढळण्याचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर शहरात समूहसंसर्ग नसतो. या निकषानुसार शहरात तो नसल्याचा दावा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केला आहे.
पंधरवडा महत्त्वाचा गणेशोत्सवात झालेल्या गर्दीमुळे उत्सवानंतर काही दिवसांत रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यानंतर आलेला नवरात्रोत्सव नुकताच आटोपला. यावेळी लोकांनी फारशी गर्दी केली नाही. पण त्यामुळे किती रुग्ण वाढतात, हे साधारण १५ दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.