मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी 10 हजारांचा आकडा ओलांडला असून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या हि 10 हजार 560 इतकी झाली आहे . तर आता पर्यंत शहरात कोरोना मुळे 358 जणांचा मृत्यू झाला आहे . एकीकडे कोरोना रोखण्यासाठीच्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने कोरोनाचे रुग्ण व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात महापालिका आणि लोकप्रतिनिधी यांना अपयश आले आहे . आज शनिवारी आता पर्यंतचे सर्वात जास्त 11 कोरोना रुग्णांचे मृत्यू दिवसभरात झाले आहेत .मीरा भाईंदर मध्ये कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे . त्याच बरोबर रोज दिडशे ते दोनशे च्या संख्येत नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत . महापालिकेचे जोशी रुग्णालय व कोविड केअर मध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार केले जात असून डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी एकीकडे उपचाराचे काम करत असताना दुसरीकडे अनेक राजकारणी , नगरसेवक व महापालिका प्रशासन मात्र आपापल्या भागातील कोरोना निर्देशांच्या उल्लंघना कडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत .जेणे करून शहरात सर्रास मास्क न घालता फिरणारे , गर्दी करणारे व बेकायदा विक्रेते मोकाट झाले असून त्यांना जबाबदारी आणि कारवाईचा कोणताच धाक उरलेला नाही . परंतु राजकारण्यांना मात्र राजकीय चमकोगिरी करण्यातच स्वारस्य असल्याचे पदोपदी दिसून येत आहे . यातूनच शहरात कोरोना रोखण्यासाठीच्या निर्देशांचे पालनच केले जात नसल्याने कोरोना संसर्ग कमी करण्यात अपयश आलेले आहे असे जाणकारांनी स्पष्ट केले .शहरातील शनिवार रात्रीच्या महापालिकेच्या आकडेवारी नुसार कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार 560 इतकी झाली आहे . यातील 8 हजार 647 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत . तर 358 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे . आत पर्यंत 35 हजार 107 लोकांचे स्वाब नमुने घेण्यात आले होते . त्यातील 24 हजार 379 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत . 21 हजार 466 जणांना महापालिकेने स्वतःच्या देखरेखी खाली ठेवले आहे .
coronavirus: मीरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या साडे 10 हजार पार ; 358 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 11:22 PM