कल्याण : कोरोनाच्या धास्तीने शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, असा प्रश्न शाळांना भेडसावत असताना कल्याणमधील आर्य गुरुकुल शाळेने विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा घेतली. आपला पाल्य आॅनलाइन परीक्षा देत असल्याचे फोटो व व्हिडीओ पालकांनी शाळेला पाठवून दिले. आॅनलाइन परीक्षेमुळे पालकांची चिंता दूर झाली आहे.कोरोनाची व्याप्ती वाढली तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, हा पेच सध्या अनेक शाळांच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनापुढे आहे. शासनाने शाळांना सुटी जाहीर केल्याने सध्या सर्वच शाळा बंद आहेत. परीक्षा लांबणीवर पडल्या तर निकाल लांबणीवर पडण्याची भीती असून शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, या आपत्तीला तोंड देत विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेता येईल, याबाबत आर्य गुरुकुल शाळेने विचार करून आॅनलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले. यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना अडचण येणार नाही आणि विद्यार्थी घरी बसून परीक्षा देऊ शकतो. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा घेण्याकरिता पालकांची परवानगी घेण्यात आली. शाळेतील ५४६ मुलांनी ही परीक्षा दिली. सीबीएसई बोर्डाच्या पद्धतीनुसार खुली परीक्षा घेता येते, अशी माहिती शाळेचे संचालक भरत मालिक यांनी दिली. आॅनलाइन परीक्षेकरिता शाळेच्या कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. पालकांनी आपल्या पाल्याचे घरी बसून परीक्षा देत असलेले फोटो व व्हिडीओ शाळेला पाठविले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा संकटाच्या काळात परीक्षा घेण्यासाठी करीत असल्याची माहिती शाळेच्या शैक्षणिक संचालक नीलम मालिक यांनी दिली.विद्यार्थ्यांना बहुपर्यायी आणि मोठी उत्तरे अशा दोन्ही पद्धतीचे प्रश्न या परीक्षेत देण्यात आले होते. एका विद्यार्थ्याच्या घरी चारपाच विद्यार्थ्यांनी जाऊन परीक्षा दिली. परीक्षेच्या पहिल्या दिवशी सोमवारी संस्कृत, गणित, सामाजिक शास्त्रांची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली. ही परीक्षा युजर फे्रण्डली असल्याची प्रतिक्रिया पालक स्मिता मोकल यांनी दिली.पाचवीत शिकणारी इर्शिता मोकल म्हणाली की, आपल्याला संगणकावर टायपिंग जमत नाही. पण, शाळेने पुरेसा वेळ दिला होता. संगणकावर परीक्षा देताना मजा वाटली. कोणतीही तक्रार असल्यास शाळांनी हेल्पलाइन नंबर दिला होता. त्याद्वारे शंकांचे निरसन केले जात होते.आॅनलाइन परीक्षेबाबत पालक रूपाली धवले म्हणाल्या की, हा प्रयोग आम्हाला आवडला. शाळेने आम्हाला लिंक दिली होती. त्यावर पेपर होता. एकाच वेळी एवढे विद्यार्थी परीक्षा देणार, त्यामुळे सर्व्हर डाउन होईल का, ही भीती होती. मात्र, तसे झाले नाही. आम्ही आमच्या पाल्याला गुण किती मिळतात, यापेक्षा आकलन किती झाले आहे, यावर भर देतो. त्यामुळे परीक्षेचा तणाव तिच्यावर कधी येत नाही. विद्यार्थी चारवी धवले हिनेही संगणकावर परीक्षा देताना मजा आली व घरातून परीक्षा देत असल्याने टेन्शन नव्हते, असे सांगितले.
Coronavirus : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा, आर्य गुरुकुल शाळेचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 1:55 AM