डोंबिवली: डिमार्ट परिसरात गर्दी करणा-या ग्राहकांवर पोलीस यंत्रणेची करडी नजर राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या परिसरात नाहक खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत होती, त्या बद्दल सोशल मीडियावर दक्ष नागरिकांनी टिका करत पोलीस यंत्रणेला लक्ष केले होते. त्याची दखल घेत सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी तातडीने सोमवारी डिमार्ट चालकांची बैठक घेत सोशल डिस्टन्स चे नियम पाळा, अन्यथा लॉकडाऊन असे पर्यंत ती सुविधा बंद करा असे आवाहन केले.त्यानुसार मंगळवारी राऊत यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादासाहेब चौरे यांच्यासमवेत डिमार्ट परिसराची पाहणी केली. त्यावेळी डिमार्ट प्रशासनाने पोलिसांच्या सांगण्यानुसार काही बदल केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. जेथे एरव्ही सुमारे ८ हजार ग्राहक जातात तेथे आता केवळ दिवसभरात २ हजार ग्राहकांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्वावर पहाटे ६ ते ७ या वेळेत कुपनचे वाटप केले जाणार आहे. त्यानूसार त्या कुपनवर वेळा देखिल टाकण्यात येणार असून त्या वेळेनूसारच ग्राहकांनी तेथे जाणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. तसेच वाहने रस्त्यावरच पार्क केल्यानंतर डिमार्टमध्ये प्रवेश केल्यावर तेथे सोशल डिस्टन्स ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना ही माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष खरेदीसाठी आतमध्ये एकावेळी अवघे ५० ग्राहक जाऊ शकतील असे नियोजन करण्यात आले. आतप्रवेश करतांना यंत्राद्वारे कपाळावर तापमान मोजून मगच शरिराचे योग्य तापमान असेल तर प्रवेश देण्यात येत असून आत गेल्यावर सॅनिटायझर लावण्यात येत आहे. अशी योग्य काळजी त्या प्रशासनाने घेतल्याचे राऊत म्हणाले.ही काळजी केवळ पोलीस दौरा होणार आहे म्हणुनच नसावी तर सातत्याने असावी यासाठी त्या गर्दीवर ड्रोनची नजर ठेवण्यात येणार असून त्याद्वारे गर्दीचे नियंत्रण राखण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले. नागरिकांना उन्हात उभे रहायला लागू नये यासाठी डिमार्ट प्रशासनाने महापालिकेकडून योग्य त्या परवानग्या काढून मंडप घालावा, आणि नागरिकांचे उन्हापासून संरक्षण करावे पाण्याची सुविधा ठेवावी, तसेच ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर मातांना शक्यतोवर प्रवेश नाकारावा, अपवादात्मक स्थितीत प्रवेश दिलाच तर त्यांची आसन व्यवस्थेची रचना लावावी असे आदेश पोलीसांनी दिले आहेत.
Coronavirus : डीमार्ट परिसरात गर्दी करणाऱ्या ग्राहकांवर पोलिसांची नजर; ड्रोन फुटेजद्वारे गर्दीवर ठेवणार लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 3:49 PM