वाडा : पालघर जिल्ह्यासाठी ३०० खाटा असलेले कोविड सेंटर तालुक्यातील पोशेरी येथे सुरू केलेले आहे. मात्र, या सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह व क्वारंटाइन असे दोन्हीही एकाच ठिकाणी असल्याने व एकाच प्रसाधनगृहाचा वापर दोन्ही रुग्ण करीत असल्याने क्वारंटाइन रुग्णांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याचबरोबर येथे सुविधांचाही अभाव असल्याने रुग्ण नाराजी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, एकट्या वाडा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२३ वर पोहोचली आहे.तालुक्यातील पोशेरी येथील कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना पॉझिटिव्ह व क्वारंटाइन केलेले रुग्ण उपचार घेत आहेत. दोन्हीही रुग्ण एकाच ठिकाणी असल्याने क्वारंटाइन केलेल्या रुग्णांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या सेंटरमध्ये एकच प्रसाधनगृह असल्याने पॉझिटिव्ह व क्वारंटाइन रुग्णांना एकाच प्रसाधनगृहाचा वापर करावा लागत असल्याने क्वारंटाइन केलेल्या रुग्णांना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे प्रसाधनगृहात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शौचालयात स्वच्छता नाही, वॉश बेसिन पाण्याने तुंबून भरले आहेत. अशा प्रकारे कोविड सेंटर हे घाणीचे साम्राज्यात असल्याची माहिती क्वारंटाइन केलेल्या रुग्णांनी दिली.सुरुवातीला आहारामध्ये खीर, दूध, काढा यांचा समावेश असायचा, परंतु आता तसे काहीच दिसत नाही. खोलीमध्ये स्वच्छता केली जात नाही. एकंदरीत, येथील वातावरण बघता एखादी चांगली व्यक्तीदेखील आजारी पडू शकेल, असे वातावरण कोविड सेंटरमध्ये असल्याचे रुग्णांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यासंदर्भात कोविड सेंटरचे प्रमुख तथा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील आरोपांचे खंडण केले आहे.
CoronaVirus News: पॉझिटिव्ह-क्वारंटाइन एकत्रच; वाड्यातील रुग्णांत भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 11:19 PM