डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे एक आव्हान असून, त्यासाठी सरकारी यंत्रणा विविध आघाड्यांवर प्रयत्न करत आहेत. मात्र, राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होतील, असे परिपत्रक काढले आहे. या परीक्षा घेण्यासाठी अट्टाहास का? सरकारने गांभीर्य लक्षात घेऊन या परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ठाण्याच्या अध्यक्षा हेमलता मुनोत यांनी मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री व ठाण्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.सरकारने धार्मिक, सामाजिक, निवडणूक, विद्यापीठातील परीक्षा आदी कार्यक्रम रद्द केले आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी १४४ कलम लागू केले आहे. यावरूनच या साथीची गांभीर्यता लक्षात येते. मात्र, सरकार दहावी, बारावीच्या परीक्षा स्थगित करत नसल्याचे दिसून येत आहे. या परीक्षा २३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. परीक्षेच्या कामात लाखो शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षा मंडळ, असे मनुष्यबळ कार्यरत असते. केंद्रावर शेकडो विद्यार्थी एकत्र येऊन परीक्षा देतात. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने सर्वांच्याच जीवाला धोका आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात. विद्यार्थ्यांपासून परीक्षा मंडळापर्यंत प्रत्येक घटकांची जबाबदारी राज्य सरकार घेईल का?, असा सवालही परिषदेने केला आहे. परीक्षा त्वरित स्थगित कराव्यात, सर्व शाळांना सुटी घोषित करावी व त्याचे पालन करण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
Coronavirus : दहावी, बारावीच्या परीक्षा त्वरित स्थगित करा, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:48 AM