डोंबिवली पश्चिमेतील कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी शास्त्रीनगर रुग्णालयास फोन केला असता रुग्णवाहिका व्यस्त आहेत. शक्य असल्यास महिलेला घेऊन ठाणे सिव्हिल रुग्णालय गाठा असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला. महिलेला तब्बल सहा तास रुग्णवाहिकेसाठी वाट पाहावी लागली. मनसे कार्यकर्त्यांनी या प्रकरणी तत्परता दाखवून प्रशासनावर दबाव निर्माण केल्यावर महिलेला घेण्यासाठी रुग्णवाहिका आली. यातून पुन्हा एकदा महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. त्याचा फटका या महिलेला बसला आहे.दोन दिवसापूर्वी डोंबिवलीतील कोरोनाग्रस्त तरुणाला रुग्णवाहिका घेण्यास आली नाही. त्या रुग्णाला चालत येण्याचा सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आला होता. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर काल सायंकाळी कल्याणमधील एका 71 वर्षीय कोरोना संशयित वृद्धाला घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका आली. पण रुग्णाला न घेताच चालक उपवास सोडण्याचे कारण सांगून निघून गेल्याचा प्रकार घडला. या घटनेपाठोपाठ आत्ता कोपरमधील गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह महिलेला रुग्णवाहिकेसाठी सहा तास वाट पाहावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मनसेचे कार्यकर्ते ओम लोके व सागर मुळे यांच्या पुढाकाराने रुग्णालय प्रशासनावर दबाव टाकल्यावर महिलेस रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही महिला नऊ महिन्याची गरोदार आहे. तिच्या प्रसूतीची तारीख जवळ आली आहे. त्यात तिचा कोरानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या पतीने तातडीने शास्त्रीनगर रुग्णालयाशी संपर्क साधला. त्याठिकाणी रुग्णालयातून सांगण्यात आले की, आज महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रुग्णवाहिका व्यस्त आहेत. महिलेला ठाणे सिव्हिलमध्ये घेऊन जाणे शक्य असल्यास तुम्ही जाऊ शकता असा उरफाटा सल्ला दिला गेला. या महिलेचा पतीच्या संपर्कात सागर मुळे होते. त्यांनी ओम लोके यांना संपर्क साधला. लोके यांनी खाजगी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. मात्र रुग्णालयाने खाजगी रुग्णवाहिकेतून घेऊ जाता येणार नाही अशी हरकत घेतली. कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला घेऊन जाण्यासाठी कोविड रुग्णालयाची रुग्णवाहिका हवी. प्रशासन पेचात पकडत असल्याने लोके यांनी प्रशासनावर दबाव टाकला. तेव्हा त्यांना सहा तासानंतर रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्यावर महिलेला ठाणे सिव्हील रुग्णालयात काल सायंकाळी दाखल करण्यात आले. गर्भवती कोरोना ग्रस्त महिलांच्या उपचाराची सोय कल्याण डोंबिवलीत नाही. त्यांच्या उपचाराची व्यवस्था ठाणे सिव्हिल रुग्णालयात केली आहे. कोपरमधील महिलेची प्रसूती तारीख जवळ आल्याने तिच्याबाबतीत अधिक चिंता होती.
प्रशासनाचा भोंगळ कारभार; 'ती' कोरोनाबाधित गर्भवती सहा तास रुग्णवाहिकेसाठी ताटकळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 6:20 PM