कल्याण : डोंबिवली पूर्वेतील क्रांतीनगरमध्ये राहणाऱ्या ३२ वर्षांच्या तरुणीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्र कोविड रुग्णालय व क्वारंटाइन सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे चार तास बसवून ठेवल्यावर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे ती व तिच्या आईची तारांबळ उडाली. या दोघींनाही होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, चुकीच्या माहितीमुळे रुग्णांचे हालही होत असल्याचीही बाब आता उघड झाली आहे.
क्रांतीनगरमधील ही तरुणी खाजगी कार्यालयात कामाला आहे. महापालिका प्रशासनाने तिला व तिच्या आईला कोरोना झाल्याचे सांगत ‘टाटा आमंत्र’ला निघून या, असे सांगितले. त्यानुसार ती आईसह तेथे गेली. मात्र, चार तास त्यांना बसवून ठेवल्यावर तरुणीला तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. मात्र, तिच्या आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. परंतु, चार तासांनंतर ती व तिची आई घरी निघून आल्या. ‘टाटा आमंत्र’ येथे कोरोनाचे संशयित व कोरोना रुग्ण असून, त्यांच्या संपर्कातही या मायलेकी आल्या. रिपोर्टची अशी गफलत कशी काय झाली, अशी विचारणा केली असता त्या तरुणीचे नाव व पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या तरुणीचे नाव सारखेच असल्याने ही गल्लत झाली, असे सांगण्यात आले.संबंधित तरुणीची आई पॉझिटिव्ह आहे. दोघींनी घरीच विलग राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना घरी पाठविले. तरुणी हायरिस्क रुग्णांच्या संपर्कातील आहे. चुकीची माहिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी ए. गौरकर यांनी स्पष्ट केले.