डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने ५० लाखांचा निधी मंजूर करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन अधिकारी (ठाणे) यांच्याकडे केली आहे.कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असताना कल्याण डोंबिवली परिसरात रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांचा समावेश असून, अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्था मिळून तयार झालेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात कोरोनावर मात करण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्य पुरवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे केडीएमसी क्षेत्रासाठी २५ लाख, ठाणे महापालिका क्षेत्रासाठी १५ लाख आणि १४ गावांसाठी १० लाख असे सुमारे ५० लाखांचा निधी आवश्यक आहे आणि तशी मागणी केली आहे.
सध्या कल्याण ग्रामीण विधानसभेच्या क्षेत्रात मनसे आमदार राजू पाटील यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये फवारणीचे काम चालू झाले आहे आणि काही ठिकाणी धान्यवाटप पण चालू केले आहे. आमदारांसोबत मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आपापल्यापरीने मदतकार्य आणि समाजसेवा करत आहेत.