ठाणे : ठामपाच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. या रुग्णालयाने हनुमाननगर येथील एका नागरिकाचा मृतदेह कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच नातेवाइकांच्या स्वाधीन केला. त्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेत अनेक नातेवाइकांनी स्मशानभूमीत गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनी उपस्थितांना मज्जाव केला. परंतु, आता मृत ५० वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्या अंत्यदर्शनासाठी आलेले व अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांची शोध मोहीम आता सुरू झाली आहे. अशा प्रकारची आतापर्यंत ही तिसरी घटना आहे.
हनुमाननगर भागातील या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कळवा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, ३० एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. या कालावधीत त्याची कोरोना चाचणीही केली होती. परंतु, अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालयाने त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. मात्र, रविवारी त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.रुग्णालय प्रशासनाच्या अशाच एका चुकीमुळे यापूर्वी लोकमान्यनगर भागात एका मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अवघ्या काही दिवसांत येथील बाधितांची संख्या ६० हून अधिक झाली आहे. त्यात आता पुन्हा नव्याने रुग्णालयाच्या आणखी एका चुकीमुळे त्याचे भोग आता येथील नागरिक, पालिका प्रशासन व पोलिसांनाही भोगावे लागणार आहेत.दिघा भागातील एक व्यक्ती येथे उपचारासाठी दाखल झाली होती. परंतु, तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच रुग्णालयाने मृतदेह नातेवाइकांना दिला होता. त्यानंतर आता ही तिसरी चूक रुग्णालयाकडून झाली आहे.सदरचे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. पोलीस आणि महापालिका प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाकडून अशा चुका होत असतील, तर त्या पाठीशी घालणे अयोग्य आहे. - नरेश म्हस्के, महापौर, ठाणे