लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : बदलापुरातील एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या मुलाचे लग्न मुंबईत जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केले होते. मात्र, या लग्नात नवरदेवाचे वडीलच पॉझिटिव्ह असल्यामुळे वऱ्हाडी मंडळींना रिटर्न गिफ्ट म्हणून कोविड मिळाला. या लग्नात बदलापुरातील अनेक बडे राजकीय पुढारीदेखील सहभागी झाल्याने त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे लग्न २९ डिसेंबरला जुहूच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केले होते. या लग्नसमारंभासाठी बदलापुरातील बडे राजकीय नेते सपत्निक हजर होते. त्यातील अनेकांना वरपित्याच्या माध्यमातून कोरोनाची लागण होऊन तशी लक्षणेही आढळत आहेत. याबाबत बदलापूर येथील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने या लग्नसमारंभात नवरदेवाकडील काही मंडळी कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
तर भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यांनेही हीच शक्यता वर्तवून कोरोना चाचणी करून घेतली. मात्र, त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. भाजपच्या एका युवा पदाधिकाऱ्यांनाही याच लग्नातून कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविली आहे.