कल्याण-कोरोनाची लागण रोकण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरु आहे. तसेच संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात समान्यांना तीन महिन्याचे रेशनिंग शिधावाटप दुकानातून देण्यास सुरुवात झाली असली तरी त्यात काही दुकानदारांकडून काळा बाजार केल्याच्या तक्रारी प्राप्त होत अहेत. काळा बाजार करणा-या वितरकांचा परवाना रद्द करण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे केली आहे.तीन महिन्याचे धान्य शिधावाटप दुकानदाराकडून दिले जाणार असल्याने नागरिक त्या ठिकाणी गर्दी करीत आहे. या गर्दीमुळे संचारबंदी व होम डिस्टसिंगचा नियम पाळला जात नाही. त्यामुळे नागरीकांच्या घरार्पयत हे धान्य पोहचविण्याची जबाबदारी सरकारची आहे. शिधावाटप दुकानदारांनी त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. धान्य वितरकांकडून काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने त्यासाठी एक गस्ती पथक तयार केले पाहिजे. या गस्ती पथकास काळा बाजार करताना एखादा वितरक आढळून आल्यास त्याचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर आणि दशरथ घाडीगावकर यांनी कल्याण शिधावाटप कार्यालयात जाऊन अधिका-याना धान्य वाटपात काळा बाजार होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी एक निवेदन सादर केले आहे. त्याचबरोबर महिला बाल कल्याण समितीच्या सभापती विणा जाधव यांनीही यासंदर्भात अधिकारी वर्गास एक निवेदन दिले आहे.
CoronaVirus: काळाबाजार करणाऱ्या धान्य वितरकाचा परवाना रद्द करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2020 3:46 PM