ठाणे - तब्येतीचे कारण देत सुट्टीवर गेलेले ठाणे शहर पोलीस दलातील तसेच एका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ ( निरीक्षक ) अधिकाऱ्याचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत बंदोबस्तात असलेल्या 25 जणांची कोरोनाची तपासणी केली असून त्याचा अहवाल येत्या एक - दोन दिवसात आल्यावर ते बाधित आहेत की नाही हे स्पष्ट होईल. तसेच संबंधित पोलीस अधिकारी सध्या नाशिक येथे उपचारार्थ दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संबंधीत पोलीस अधिकारी आजाराचे कारण देत 5 एप्रिल रोजी रजेवर गेले. मूळ नाशिकचे रहिवासी असल्याने तेथे गेल्यावर त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्या तपासणी अहवालात ते पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दुजोरा देताना, संबंधित अधिकाऱ्याचे सहकारी असलेल्या 20 ते 25 पोलिसांची ही तातडीने कोरोना टेस्ट करून घेतली आहे. येत्या एक ते दोन दिवसात त्यांचा अहवाल येईल,असे त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.