अनिकेत घमंडीडोंबिवली : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कल्याण-डोंबिवली रेड झोनमध्ये आलेले असताना कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मनसे आ. राजू पाटील यांनी महापालिकेला उपलब्ध करून दिलेल्या आर.आर. इस्पितळातील असुविधांबाबत सोशल मीडियावरील पोस्टने शिवसेना विरुद्ध मनसे राजकारणाला तोंड फुटले.‘कोविडसाठी आर.आर. हॉस्पिटल हे सर्व सुविधा नसतानाही १० लाख रुपये भाडे मिळणार असल्यानेच पाटील यांनी दिल्याचे संदेश व्हायरल झाले. त्या हॉस्पिटलचा करारनामाही व्हायरल झाल्याने दोन पक्षांत ‘सोशल वॉर’ सुरू झाले. आर.आर. हॉस्पिटल कोविडसाठी मनसेने दिल्याने भविष्यात या मुद्द्याचे राजकीय भांडवल हा पक्ष करणार, हे शिवसेनेच्या लक्षात आले. मनसेच्या या भूमिकेपूर्वी डोंबिवलीतील अन्य एक खासगी इस्पितळ आधीच खा. श्रीकांत शिंदे यांनी कोविड रुग्णांसाठी महापालिकेसमवेत करारबद्ध केले होते. संजय हेंद्रे चौधरी याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या पोस्टमध्ये आर.आर. इस्पितळातून आम्ही जिवंत बाहेर येऊ की, आमच्या डेड बॉडीज बाहेर येतील, असा सवाल करीत तेथील असुविधांचा पाढा वाचला. आर.आर. हॉस्पिटलला भाड्यापोटी मिळणाऱ्या १० लाखांसाठी आ. पाटील यांनी करार केल्याचे आरोप केले गेले. दोन पोती तांदूळ देऊन फोटो काढून घेणारे आम्ही नाही, असा टोला मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदेश प्रभुदेसाई यांनी लगावला.दरम्यान, आर.आर. रुग्णालयाशी महापालिकेने केलेल्या करारानुसार रुग्णालयाने रुग्णांना सेवा देणे बंधनकारक आहे. चौधरींच्या तक्रारीबाबत रुग्णालयाकडून खुलासा मागवला आहे. निआॅन रुग्णालयात जागा झाल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार त्यांना पुन्हा तेथे शुक्रवारी हलवले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेने दिली.कोरोनासारख्या जीवघेण्या आजारामधून कल्याण- डोंबिवलीला बाहेर काढण्याकडे माझे लक्ष आहे. पहिल्या दिवसापासून त्यासाठीच मी अहोरात्र झटत आहे. मला राजकारण करण्यात रस नाही.- डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार>महापालिका आयुक्तांनी चार हॉस्पिटल ताब्यात घेण्याबाबत करार केले असून जो करार सगळ्या हॉस्पिटलसंदर्भात झाला, तोच माझ्यासाठी लागू झाला. मग, केवळ ‘आऱआऱ’चाच करार व्हायरल करण्यामागे शिवसेनेचा हेतू चांगला आहे का? इस्पितळाच्या भाड्यापोटी येणे असलेले १० लाख रुपये अद्याप आलेले नाहीत़ ते आल्यावर काय करायचे ते ठरवणार आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते असणारे पेशंट मध्यरात्री आऱआऱला येतात़ तिथल्याच गैरसोयीची पोस्ट व्हायरल होते आणि एकदम ते पुन्हा अन्य खासगी हॉस्पिटलला शिफ्ट होतात, हे राजकारण केवळ आमची बदनामी करण्यासाठी शिवसेना करत आहे. भाजपही त्यात मागे नसावी.- प्रमोद (राजू) पाटील, आमदार, मनसे>सूतिकागृहासाठी सरकारकडून पाच कोटी आणले होते. तो निधी महापालिकेकडे असून तातडीने ‘६७ क’ प्रमाणे वापरावे, असे पत्र आमदार या नात्याने आयुक्तांना दिले आहे. त्या पैशांतून महापालिकेची रुग्णालये अद्ययावत करावीत. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करून तो आणण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी मी पाठपुरावा करेन.- रवींद्र चव्हाण,आमदार, भाजप
CoronaVirus : शिवसेना-मनसेला राजकारणाची लागण, सोशल मीडियावरील पोस्टवरून पेटले वॉर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 12:51 AM