अजित मांडकेठाणे : कोरोनाच्या लॉकडाऊनला आता १०० दिवस पूर्ण होत आहेत. मात्र, ७५ दिवस लॉकडाऊन झाल्यानंतर मागील २५ दिवस व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, उद्योजक, व्यापारी आणि नागरिक प्रयत्न करीत आहे. मात्र, अद्याप कोणालाही यश आलेले नाही. गृहसंकुलांची कामे सुरू झाली असली तरी विक्री शून्य आहे, दुकानांमध्ये एक ते दोन ग्राहकच येत आहेत. या १०० दिवसांत हजारो कोटींचे नुकसान या सर्व यंत्रणांचे झाले आहे.
देशात जाहीर झालेला लॉकडाऊन जवळपास ७५ दिवस कायम होता. २ जूनच्या सुमारास पहिला आणि आता दुसरा अनलॉक जाहीर झाला आहे. परंतु, या कालावधीत अनेक मजूर गावी गेले आहेत. आता अनलॉकानंतर मागील १५ ते २० दिवस व्यवहार पूर्वपदावर आणण्यात गेले आहेत. तसेच गृहसंकुलांची रखडलेली कामे हळूहळू सुरू झाली आहेत. परंतु, अद्यापही नवीन बुकिंग मात्र झालेले नाही. लॉकडाऊनमध्ये बांधकाम व्यवसायाचे सुमारे १२ ते १५ हजार कोटींचे नुकसान झालेले आहे.
लग्नसराईच्या दिवसांत ज्वेलर्सचेही ५०० कोटींच्या आसपास नुकसान झाले आहे, ते भरून कसे काढणार, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. हीच परिस्थित व्यापाऱ्यांचीही आहे. लॉकडाऊननंतर दुकाने सम आणि विषम तारखांनाच खुली आहेत. त्यात ग्राहकही भीतीपोटी दुकानांत येताना दिसत नाही. त्यामुळे दुकानाचे भाडे, वीजबिल आणि जे काही कर्मचारी कामावर येत आहेत, त्यांचा पगार आजघडीला निघू शकत नाही, अशी परिस्थिती आहे.
लघुउद्योजकांनाही हजारो कोटींचा फटका बसला आहे. त्यातच वीजबिलांमुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच तीन महिने सर्व उद्योग बंद होते. अनलॉक झाल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील उद्योगांनाच कारखाने सुरू करण्यास परवानगी आहे. परंतु, असे असले तरी या उद्योगांना लागणारा कच्चा माल मिळत नाही, मनुष्यबळ आजही कमी आहे. त्यात वाहतूकदार दुप्पट ते तिप्पट आकारणी करीत आहेत. आयात-निर्यात करणाऱ्यांवर डिर्मेस चार्जेस लावले जात आहेत. त्यामुळे उद्योजक मेटाकुटीला आला आहे. वाहनविक्री करणाºयांनीही या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी विविध योजना पुढे आणल्या आहेत. अनलॉक झाल्यानंतर ही परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. परंतु, मागील २५ दिवसांत ग्राहक येथे फिरकलेलाच नाही. ठाणे महापालिका प्रशासनाचाही मागील तीन महिन्यांत आर्थिक गाडा रुळावरून घसरला आहे. या तीन महिन्यांत सर्वच कर्मचारी हे कोरोनाच्या कामात व्यस्त झाल्याने कोणत्याही आस्थापनेला बिले लावली गेली नाहीत, तसेच उत्पन्नाचे इतर स्त्रोतांमधूनही महापालिकेला शून्य उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे हीच परिस्थिती राहिली तर येत्या काही महिन्यांत कामगारांचे पगार देणेही शक्य होणार नाही, अशी परिस्थिती आली आहे. त्यातही या सर्वच उद्योग, व्यवसाय, व्यापाºयांना, नागरिकांना महावितरणने मोठा शॉक दिला आहे. लघुउद्योगांना तर ५ ते २५ लाखांपर्यंत बिले आली आहेत. ती कशी भरायची असा पेच निर्माण झाला आहे.अत्यावश्यक सेवेतील २५ ते ३३ टक्के उद्योगांना परवानगी मिळालेली आहे. बाहेरगावी गेलेले कामगार अद्याप आलेले नाहीत. आर्थिक चणचण असताना वीजदरवाढीचा फटका मोठा फटका बसला आहे. उद्योग बंद असतानाही लाखात बिले आहेत, त्याचे पैसे कसे भरायचे असा पेच आहे. आजही कामगार मिळत नाहीत, आर्थिक समस्या आहेत. बºयाच उद्योगांना वाहतूक खर्च वाढल्याने त्याचही फटका बसला आहे. एकूणच यामुळे ठाण्यातील लघुउद्योजकांना हजारो कोटींचे फटका बसला आहे. - संदीप पारीख, उपाध्यक्ष, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, असोसिएशनठाणे महापालिकेची सर्वच यंत्रणाही कोरोनाच्या लढ्यात सहभागी झालेली आहे. तसेच कर्मचारीही कमी प्रमाणात कामावर येत आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर ज्या प्रमुख उत्पन्नांच्या स्त्रोतांमधून उत्पन्न येणे अपेक्षित होते. ते आलेले नाही. ग्राहकांना बिलेदेखील अद्याप लावली गेलेली नाहीत. त्यामुळे तीन महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत शून्य उत्पन्न प्राप्त झाले आहे. - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपाकाय सुरू?लग्नसराईच्या कालावधीत लॉकडाऊन झाल्याने गारमेंटवाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनलॉकनंतर दुकाने खुली केली असली तरी मागील १५ दिवस ग्राहकांना पुन्हा कनेक्ट करण्यात गेले. आता कुठे ग्राहक येत होते, परंतु लॉकडाऊनमुळे ते उत्पन्न मिळणार नाही.- मितेश शहा, अध्यक्ष, नौपाडा व्यापारी मंडळअनलॉक जाहीर झाल्यानंतर आम्ही आॅटोविक्री करण्यासाठी सुरुवात केली होती. परंतु, पहिले १५ ते २० दिवस आमच्या शोरूममध्ये कोणीच फिरकले नाही. आता कुठे चौकशी सुरू झाली आहे. परंतु, झालेले नुकसान हे खूप आहे, ते भरून निघणे शक्य नाही. अद्यापही आॅटो खरेदीसाठी कोणी फिरकलाच नाही. - सुरेंद्र उपाध्याय, आॅटोविक्रेतेकाय बंद?बांधकाम व्यावसायाला याचा हजारो कोटींचा फटका बसला आहे. यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न करीत आहोत. रुग्ण वाढू नये म्हणून आता पुन्हा लॉकडाऊन घेतला आहे. त्यामुळे त्याचे पालन आता करावेच लागणार आहे. - जितेंद्र मेहता, उपाध्यक्ष, एमसीएचआय, ठाणेलॉकडाऊनमुळे शोरूममधील एकही गाडी विकली गेली नाही. त्यामुळे अनलॉक जाहीर होईल, तेव्हा ग्राहकांसाठी वेगळीच किंमत देऊन गाड्या विकण्याचा विचार होता. तसे नियोजन केले होते. परंतु, अनलॉकनंतरही ग्राहक शोरूमकडे वळले नाहीत. त्यामुळे आता विजेचे बिल, कर्मचाºयांचा पगार व शोरूमचे भाडे कसे भरायचे असा प्रश्न पडला आहे. - संतोष तिवारी, वाहन व्यावसायिक