डोंबिवली: लॉकडाऊनच्या काळात माणसांचा वावर व प्रदूषण कमी झाल्याने सापांना त्यांच्या जोडीदाराशी सामना करायला मोकळीक मिळाल्याचे दिसत आहे. डोंबिवली एमआयडीसी मिलापनगरमध्ये असलेल्या बंगल्यांच्या भोवती हिरवळ भरपूर आहे. सध्या उष्णता वाढल्यामुळे आणि लॉकडाऊनमुळे शांतता असल्याने धामण या जातीचे नर साप आपल्या बिळातून बाहेर पडून मादीकडे आकर्षिले जात आहेत. यावेळी त्यांच्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी द्वंद्वयुद्ध होत असते. असे द्वंद्वयुद्ध या सापांत जवळपास तासभर चालू होते. काही रहिवाशांना हे द्वंद पाहता आले.
धामण जातीचे हे साप बिनविषारी असतात. याचे प्रमुख भक्ष उंदीर, बेडूक, कीटक हे असते. सदरील दृश्य क्षण मिलापनगर मधील रहिवासी व पेंढरकर कॉलेजचे क्रीडा शिक्षक उदय नाईक यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात टिपले. यापूर्वी काही दिवसांपासून येथे अनेक प्रकारचे व कधी न दिसणारे पक्षी दिसू लागले आहेत. हवेतील कमी झालेले प्रदूषण व वातावरणातील झालेला बदल यामुळे अशी दृश्य पाहण्यास मिळत असल्याची माहिती रहीवासी राजू नलावडे यांनी दिली.