मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसागणिक वाढत आहे. राज्यात सोमवारी ४६६ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून आता रुग्णसंख्या ४ हजार ६६६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी नऊ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात सात मुंबईतील व दोन मालेगावमधील आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा २३२ वर पोहोचला आहे. तर मुंबईतही सोमवारी १८७ रुग्णांचे निदान झाले. मुंबईची संख्या ३ हजार ३२ वर पोहोचली आहे. तर मुंबईत बळींचा आकडा १३९ झाला. पुण्यात ५९ नव्या रूग्णांची नोंद झाल्याने एकूण संख्या ७५६ वर पोहोचली आहे. मात्र, अद्यापही लोकांना या परिस्थितीचे गांभीर्य दिसून येत नाही. लोकं विनाकारण घराबाहेर पडून कोरोनाला घरात आमंत्रण देत असल्याचं दिसून येतयं. या नागरिकांसमोर आता महाराष्ट्र पोलीसही हतबल झाल्याचं दिसून येतंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील १४ मे पर्यंतचा लॉकडाऊन वाढवून ३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन घोषित केला आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला होता. कारण, देशातील कोरानाबाधित राज्यांमध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल आहे. त्यामुळे लोकांना घरााबाहेर न पडण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. तसेच, विविध समाज प्रबोधनातून पोलीस बांधवही नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करत आहेत. पोलिसांकडून ज्याप्रमाणे लाठी-काठीचा प्रसाद दिला जातो, तसाचं प्रेमळ सल्लाही दिला जातो. मात्र, नागरिकांना गांभीर्य लक्षातच येत नाही. त्यामुळे, आज पोलिसांनी चक्क आरती करुन नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केलंय. ठाण्यातील काही नागरिक आज सकाळीच मॉर्निग वॉकसाठी घराबाहेर पडल्याचं पोलिसांना दिसून आलं. विशेष म्हणजे हे सर्व नागरिक सुशिक्षित असूनही ते शासकीय नियमांचे पालन करत नाहीत. त्यामुळे ठाणे पोलिसांनी चक्क आरती ओवाळून या नागरिकांपुढे आता पोलीसही हतबल झाल्याचेच सूचवले आहे.
दरम्यान, सोमवारी राज्यात झालेल्या मृत्यूंपैकी सहा पुरुष तर तीन महिला आहेत. या मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील पाच रुग्ण आहेत. तर एक रुग्ण ४० ते ६० वयोगटातील व एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखींपैकी दोन रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. उर्वरित सात जणांपैकी पाच रुग्णांमध्ये ७१ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार होते.
७१,६११ जणांचे नमुने निगेटिव्हआजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ हजार ९२ नमुन्यांपैकी ७१ हजार ६११ प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात सोमवारी ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर आजपर्यंत राज्यातील ५७२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक घरगुती अलगीकरणात असून ६ हजार ८७९ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत