ठाणे : हॉस्पिटलमध्ये कोणत्याही आजाराने मरण पावलेल्या व्यक्तींच्या अंत्ययात्रेत येणारे नातेवाईक व मित्रमंडळीना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून कुणाचाही मृतदेह रुग्णालयातून घरी न पाठवता थेट स्मशानभूमीत पाठवून कमीतकमी लोकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी गुरुवारी दिले.
कोव्हीडबाधित रुग्णांच्या मृतदेहावर संक्रमण प्रतिबंधक प्रक्रियेचे पालन करून थेट स्मशानभूमीमध्ये दाहसंस्कार किंवा दफन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले असून, तशी नियमावलीच शहरातील सर्व रुग्णालयांना प्रशासनाला पाठविण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावताना निर्देशांचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आल होते. या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर संबंधित मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन, आयुक्तांनी नवे आदेश काढले आहेत.