अजित मांडकेठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण झपाट्याने वाढत असले, तरी आता जिल्ह्याला दिलासा देणारी बाबदेखील समोर आली आहे. काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ४१ हजार १८० रुग्ण कोरोनाने बाधित झाले आहेत, तर याच कालावधीत तब्बल ३ लाख ८२ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे निश्चितच नव्याने पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णांसाठी ही चांगली गोष्ट म्हणावी लागणार आहे. कोरोनावर वेळीच उपचार केले तर रुग्ण पूर्णपणे बरा होत आहे. विशेष म्हणजे एप्रिलच्या अवघ्या २४ दिवसांत जिल्ह्यात तब्बल एक लाख ९१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. आतापर्यंत ३९ लाख ७ हजार ७१४ जणांची कोरोना चाचणी केली असून, त्यात चार लाख ४१ हजार १८० रुग्ण बाधित झाले आहेत, तर तीन लाख ८२ हजार बरे झाले. सात हजार १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५१ हजार ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दोन महिन्यांपासून ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढताना दिसत आहे. रोजच्या रोज जिल्ह्यात चार ते पाच हजारांच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. त्यातही मृत्यूचे प्रमाणदेखील वाढले आहे. मार्चअखेर जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ३ लाख १९ हजार ११ एवढी होती, तर एप्रिलअखेर ही संख्या ४ लाख ४१ हजार १८० एवढी झाली आहे.
घाबरू नका, आम्हीही हरवले कोरोनालामी आणि माझी पत्नी दोघेही कोरोनाबाधित झालो होतो. परंतु, कोरोना झाला म्हणून आम्ही हरलो नाही. आम्ही वेळेत कोरोना चाचणी केली आणि दोघेही रुग्णालयात दाखल झालो. दहा दिवस योग्य उपचार घेऊन आम्ही आमच्या कुटुंबात परत आलो. - रवींद्र क्षीरसागर - ज्येष्ठ नागरिक