ठाणे : कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेने गुरुवारी एका दिवसात तब्बल ५,०५२ इतक्या चाचण्या केल्या. तर, आता शहरातील मॉलमध्ये येणा-या ग्राहकांसह परराज्यांतून येणाºया मजुरांसाठी ठाणे रेल्वेस्थानकात मोफत अॅण्टीजेन चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. चार पथके या चाचण्या करीत असल्याचे महापालिकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सातत्याने चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचबरोबर महापौर नरेश गणपत म्हस्केही याचा पाठपुरावा करीत आहेत. त्यानुसार, आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरात प्रभाग समितीनिहाय मोफत अॅण्टीजेन चाचणी केंद्रे सुरू केली आहेत.सुरुवातीला महानगरपालिका क्षेत्रात तीन हजारांपेक्षा जास्त आणि त्यानंतर रोज चार हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट त्यांनी निश्चित केले होते. याशिवाय, गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये महापालिका तसेच खासगी प्राधिकृत प्रयोगशाळांच्या माध्यमातून सातत्याने चार हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने साध्य केले आहे. यानुसार, गुरुवारी शहरात सर्वाधिक एकूण ५,०५२ चाचण्यांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तसेच दुसºया बाजूला रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यातही प्रशासनाने यश मिळविले आहे.गणेशोत्सवामुळे वाढले रुग्णठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून आम्ही चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आम्ही रोज चार हजारांच्यापुढे चाचण्या करीत आहोत. गुरुवारी पाच हजार चाचण्यांचा टप्पा पार केला आहे. गेल्या आठवड्यात काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण, गणेशोत्सवामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले होते. त्याचबरोबर आम्ही चाचण्यांची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे थोडी फार संख्या वाढली आहे. पण, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. महापालिका प्रशासन याबाबत सतर्क असून कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास महापालिका सक्षम आहे, असे आयुक्त म्हणाले.
coronavirus: ठाणे स्थानक, मॉलमध्ये मोफत अॅण्टीजेन चाचणी, दिवसाला पाच हजार चाचण्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 2:32 AM