अजित मांडकेठाणे : ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरू लागली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दिवसाला नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणदेखील टार्गेट होत आहेत. त्यामुळे ठाणेकरांच्या चिंतेत अधिक वाढ होत आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रकोप ठाण्यात सुरू झाला. मधल्या काळात रुग्णवाढीचा दर काहीसा कमी झाला होता. परंतु फेब्रुवारी अखेरपासून पुन्हा रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यापूर्वी कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना होता. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांचीच संख्या जास्त होती. याशिवाय मृत्यूचे प्रमाणदेखील त्यांचेच जास्त होते. परंतु आता तरुण रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आता कामानिमित्ताने किंवा इतर कारणांमुळे तरुण मंडळी घराबाहेर पडू लागली आहेत. त्यामुळे त्यांचा आकडा वाढत आहे.
याशिवाय ते ज्येष्ठांपेक्षा सजग असल्याने थोडा त्रास जाणवला तरीदेखील चाचणी करतात. त्यामुळेही तरुण रुग्ण वाढताना दिसत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. बहुसंख्य तरुणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, आतापर्यंत ठाणे महापालिका हद्दीत ७१ हजार १० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यातील ६३ हजार १३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १४३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, ५४९९ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. पहिल्या लाटेत ६० वयोगटापुढील रुग्णांचे प्रमाण १८ टक्क्यांच्या आसपास, तर ५१ ते ६० वयोगटातील रुग्णांचे प्रमाण १७.३ टक्के होते. याच कालावधीत तरुणांचे प्रमाण हे १५.८ टक्के होते. आता दुसऱ्या लाटेत हे प्रमाण उलट होताना दिसत आहे. कोरोनाबाधित तरुण रुग्णांचे प्रमाण हे १८ टक्क्यांच्या आसपास पोहोचले असून, ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.
कोणत्या वयोगटाचे सर्वाधिक बळी?
दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांमध्ये २० ते ३९ वयोगटातील अधिक रुग्ण आढळले आहेत. मागील २३ दिवसांत या वयोगटातील २९०६, तर ४० ते ५९ वयोगटातील २७६५ रुग्ण आढळले आहेत.
दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या संख्येत ज्येष्ठांच्या तुलनेत तरुणांचे प्रमाण निश्चितच अधिक आहे. तरुण मंडळी कामासाठी किंवा इतर काही कारणांसाठी बाहेर निघत असल्याने आणि ते आरोग्याच्या दृष्टीने सतर्क असल्याने त्यांच्याकडून चाचण्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच हा आकडा काहीसा जास्त दिसत आहे - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा