ठाणे - ठाण्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक माजिवडा मानपाडा प्रभाग समितीला अधिक बसला असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रभाग समितीत आतापर्यंत ३१ हजार ६२० रुग्ण आढळले असून त्यातील ३१ हजार ५८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर येथे तब्बल ३९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या खालोखाल नौपाडा प्रभाग समितीत २८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सर्वात कमी ३ हजार ३१५ रुग्ण हे मुंब्य्रात आढळले असून त्यातील ३ हजार १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे येथे प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या ७५ एवढी आहे.
ठाणे महापालिका हद्दीत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत १ लाख २८ हजार ७४५ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून त्यातील १ लाख २४ हजार ९४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या प्रत्यक्ष स्वरुपात १७३४ जणांवर उपचार सुरू आहेत. तर १९१७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा शहरातील माजिवडा मानपाडा प्रभाग समितीला बसला आहे. त्या खालोखाल नौपाडा, वर्तकनगर, कळवा, उथळसर, लोकमान्य सावरकरनगर, वागळे आणि दिवा या प्रभाग समितीला बसला आहे. परंतु कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या दुस:या लाटेत तर या प्रभाग समितीत दिवसाला ४०० ते ५०० रोज नवे रुग्ण आढळत होते. पहिल्या लाटेत झोपडपटटी भागात रुग्ण संख्या अधिक दिसून आली तर दुसऱ्या लाटेत झोपडपटटीसह गृहसंकुलाला कोरोनाचा विळखा अधिक प्रमाणात बसल्याचे दिसून आले आहे. त्या खालोखाल नौपाडय़ातही कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यु देखील अधिक झाल्याचे दिसून आले आहे. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत ३९९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर नौपाडय़ात २८१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याची माहिती पालिकेच्या सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान एकीकडे या प्रभाग समितीमधील कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचा फटका मुंब्रा प्रभाग समितीला अधिक स्वरुपात बसला नसल्याचे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही दिसून आले आहे. त्यामुळे मुंब्रा पॅटर्न पुन्हा एकदा हिट झाल्याचे दिसून आले आहे. सध्या येथे ५ ते ८ नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर येथे एकूण ३ हजार ३१५ रुग्ण आढळले असून त्यातील ३ हजार १३० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर आतापर्यंत येथे ११० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या ७५ जणांवर येथे प्रत्यक्ष स्वरुपात उपचार सुरू आहेत.