ठाणे - येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारी कार्यालयात केवळ 10 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थित ठेवणे सक्तीचे केले. तर सर्व गट अ व ब गटाच्या अधिका-याची 100 टक्के उपस्थिती अनिवार्य असण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी जारी केले. याशिवाय अत्यावश्यक काम नसेल तर कोणत्याही नागरिकास कार्यालयात प्रवेश देण्यास बंदी घातली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून कार्यालयात प्रतिबंधात्मक उपाययोजनाची २० एप्रिलपासून या आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद यंत्रणेला दिले आहेत. यासाठी विविध विभाग प्रमुखांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय कार्यालयासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनां नुसार हे आदेश जारी केल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. वाय.जाधव यांनी सांगितले. सर्व कार्यालयात कर्मचाऱ्यांची केवळ 10 टक्के उपस्थितीच असणार आहे. कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेमधील प्रत्येकी 6 फुटांचे अंतर आवश्यक आहे. मोठ्या स्वरुपात कोणत्याही सभा घेता येणार नाही. अत्यावश्यक कामाशिवाय कोणत्याही व्यक्तीस कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.तसेच अत्यावश्यक कामासाठी येणाऱ्या अभ्यंगत यांना मास्क वापर करणे सक्तीचे करण्यात आले आहे. कार्यालय व परिसरात कोणलाही थुंकता येणार नाही. प्रत्येक कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर हॅन्ड सॅनिटाईज उपलब्ध ठेवण्या ची सक्ती करण्यात आली आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी, यांनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर महिला कर्मचाऱ्यांचे 5 वर्षा आतील लहान बाळ असल्यास, त्यांनी घरुन काम करण्याची लेखी विनंती केल्यास तशी मुभा संबंधित विभाग प्रमुख यांनी द्यावी , असे आदेश सोनवणे यांनी दिले आहेत. तर निर्जंतुकीकरण व साफसफाई करण्याची जबाबदारी बांधकाम विभागावर तर थर्मलस्क्रीनिगची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे आहे. अधिकारी , कर्मचारी आदींंना थर्मल स्क्रीनिग व सॅनिटाईज करूनच कार्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. वाहने प्रवेशव्दारावर निर्जंतुकीकरण करणेत येणार आहेत. कार्यालयातील अंतर्गत भाग दररोज निर्जतुकीकरण, व-हांडा, जिना दररोज साफसफाई करण्यात येणार आहेत.
coronavirus : अत्यावश्यक कामाशिवाय ठाणे जि. प. त नागरिकांना प्रवेश बंद, कार्यालयात केवळ 10 टक्के कर्मचारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 3:28 PM