ठाणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाणे शहरात सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांनी किराणा सामान भरण्यासाठी किराणा दुकाने, तसेच पावसाळी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारातील दुकानांमध्ये रविवारी मोठी गर्दी केली.
१ जूनपासून राज्यासह ठाणे शहरात काही प्रमाणात अनलॉक झाल्यावर किराणा मालाची दुकाने जास्त वेळ तर अन्य दुकानेही काही वेळासाठी उघडली होती. ग्राहकांची सोय म्हणून किराणा वस्तूंसाठी मोठे मार्टही दिवसभर खुले ठेवले होते. वस्तू खरेदी करायला पर्याय मिळत असल्याने नागरिक काहीसे निश्चिंत होते. छोट्याछोट्या दुकानात एकाचवेळी गर्दी होत नव्हती; मात्र अनलॉकनंतर कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला आहे. ठाण्याच्या विविध प्रभागांतून रुग्णांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. हे लक्षात घेता, ठाणे शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन होण्याची चिन्हे आहेत. परिणामी गेले दोन दिवस अन्नधान्याच्या वस्तू, भाजीपाला खरेदीसाठी लोकांनी जवळपासची दुकाने, मार्टमध्ये गर्दी केली होती. गावदेवी, जांभळी नाका येथील मार्केटमधील अन्य दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. पावसाळी चप्पल, छत्र्या, रेनकोट, ताडपत्रीसाठी वापरला जाणारा प्लास्टिकचा कागद, शालेय साहित्य याचबरोबर कपडे घेण्यासाठीही लोकांनी गर्दी केलेली दिसली. लॉकडाऊन पुन्हा केव्हा संपेल आणि आपल्याला आवश्यक असलेल्या वस्तू तेव्हा मिळतील की नाही, या चिंतेपायीच वस्तू खरेदीसाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या.पालिकेच्या आशीर्वादाने बेकायदा भाजीबाजारमीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे बंदी असूनही भाजी व मासळी बाजार मात्र सर्रास भरत असून गर्दी होत आहे. परंतु या बेकायदा बाजारांसह फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करत असल्याने कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. भाजी बाजारांत गर्दी होत असून अनेकजण मास्कही घालत नाहीत.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. अशा बेजबाबदार नागरिकांमुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका वाढला आहे. बेकायदा बाजार तसेच रस्त्यांवर बसणारे फेरीवाले यांच्यावर कारवाईची जबाबदारी महापालिकेची असूनही संबंधित कारवाई करत नसल्याने पालिकेचा वरदहस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.उल्हासनगरमध्ये १५ दिवसांचा लॉकडाऊन घेण्याची मनसेने केली मागणीउल्हासनगर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ दिवसांचा लॉकडाऊन करण्याची मागणी शहर मनसेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. उल्हासनगरमध्ये गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली असून रुग्णांची संख्या १६०० पार गेली आहे. तसेच संशयित रुग्णांचे उपचाराविना हाल होत असून खाजगी रुग्णालये सहकार्य करत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला. तसेच दुकानदारांकडून पी -१ व पी- २ चे सर्रासपणे उल्लंघन होत असून वाहनांच्या गर्दीने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. हे थांबविण्यासाठी १५ दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी मनसेने केली आहे.