- अजित मांडकेठाणे : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनानेखाजगी कंपन्यांच्या ठिकाणी ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तशा सूचना लघुउद्योग किंवा इंडस्ट्रिजला दिल्या नसल्या, तरी असे झाल्यास त्याचा फटका जिल्ह्यातील २० हजारांहून अधिक लघुउद्योगांसह मोठ्या उद्योगांना बसणार आहे. आधीच मंदीमुळे ६० ते ७० टक्के उद्योगांना फटका बसला असताना आता ही वेळ आली, तर कामगारांच्या पगारांबरोबर, बँकेचे हप्ते, कर्जफेड, पीएफची रक्कम, जीएसटीची रक्कम भरणे या सर्वांवर परिणाम होऊन काम बंद झाल्याने येथील उद्योग आणखी मोठ्या संकटात जातील, अशी भीती उद्योजक आता व्यक्त करीत आहेत.आधीच मंदीमुळे जिल्ह्यातील अनेक उद्योग बंद झाले असून ४० टक्के उद्योगांना याचा फटका बसला आहे. त्यात आता ५० टक्के कर्मचारी कमी करण्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हे केवळ आयटी कंपनीवाल्यांनाच शक्य आहे. जिल्ह्यातील इतर उद्योगांना हे शक्य नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात स्टील इंडस्ट्री आणि इतर छोटेमोठे उद्योग कसेतरी तग धरून आहेत. कोरोनाचा पहिला फटका या उद्योगांना बसला असून चीनमधून येणारा माल बंद झाला आहे. त्यामुळे त्यांचे उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी घटले असल्याची माहिती लघुउद्योग संघटनेने दिली आहे. दुसरीकडे अनेक उद्योगांचे उत्पादन विकले गेले असले, तरी त्याचे पैसे आता कोरोनाचे कारण पुढे करून ३१ मार्चनंतरच मिळतील, असेही सांगितले जात आहे.50% कामगार घरी बसवले, तर त्याचा आणखी फटका या इंडस्ट्रीला बसू शकतो. कारण, या फिल्डमध्ये कोणी वेल्डर, फीटर आदींसह इतर काम करणारे कामगार आहेत. त्यामुळे एखादा कामगार आला नाही, तर त्याचे काम कोण करणार आणि दुसरा कामगार असेल तर दुसरा कामगारही बसून राहणार आहे, त्यामुळे काम हे होणारच नाही. हा सर्वात मोठा तोटा आहे, शिवाय परदेशात ५० टक्के कामगारांना घरी बसविले तरी त्यांचा पगार हा शासन देणार आहे.आपल्याकडे शासन यावर काय विचार करीत आहे, त्यावरच पुढील दिशा अवलंबून राहणार आहे. तसेच यामध्ये उत्पादन बंद होण्याची शक्यता जास्तीची असून तसे झाल्यास सर्व गणिते बिघडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार, जीएसटी भरणे, गव्हर्नमेंटचे इतर टॅक्स, पीएफची रक्कम आदींवरदेखील त्याचा परिणाम होणार आहे. शिवाय, अनेक उद्योगांनी उत्पादने तयार करण्यासाठी बँकांकडून कर्ज काढलेले आहे. परंतु, उत्पादन झाले नाही तर बँकांचे हप्ते थकणार आहेत.त्यामुळे बँक त्याची वसुली करण्यासाठी टोकाची पावले उचलण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आताच एका कंपनीचा पीएफचा हप्ता भरण्यास तेही शासनाची वेबसाइट तीन दिवस हॅक असतानाही उशीर झाल्याने आता तुम्ही या स्कीममध्ये बसू शकत नसल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्याला आयटी रिटर्नमध्येही फटका बसणार आहे. एकूणच कोरोनाचे संकट अधिक गडद झाले, तर उद्योगांना मोठ्या संकटांना सामोरे जाणे भाग पडणार आहे.परदेशात कामगारांच्या पगाराची जबाबदारी शासनाने घेतली आहे. त्यानुसार, शासनाने यातील ५० टक्के रक्कम दिली, तरी यातून काही मार्ग निघू शकणार आहे. आधीच डबघाईला आलेल्या उद्योगांना मात्र कोरोनामुळे फटका बसणार, हे नक्की. - संदीप पारीख, उपाध्यक्ष, टीसामंदीमुळे आधीच उद्योगांना फटका बसला आहे. त्यात आता चीनमधून येणारा मालही बंद झाला आहे. काहींनी केलेल्या कामाचे पैसे ३१ मार्चनंतर देण्याचे सांगितले आहे, त्यामुळे ही घरघर वाढणार आहे. - एकनाथ सोनावणे, कार्यकारी सचिव, टीसा
Coronavirus: ...तर २० हजारांहून जास्त उद्योगांना फटका, उद्योजकांना भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 2:38 AM