अंबरनाथ : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात नवीन उपाययोजना आखण्यासाठी मंगळवारी पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा घेतली होती. या सभेत कोरोनावर चर्चा कमी आणि राजकीय हेवेदाव्यांवर चर्चा रंगली. त्यामुळे ही सभा गुंडाळण्याची वेळ आली आणि कोरोनाच्या बाबतीत करायच्या उपाययोजना या बाजूला राहिल्या. अंबरनाथ नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा पालिकेत बोलावण्यात आली होती. या सभेला नगरसेवकही उपस्थित होते. या सभेत मुख्याधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोनावर माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र, माहिती देत असतानाच उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी मध्येच शहरातील सफाई कामगारांचा विषय घेतला. आपत्कालीन परिस्थितीत समीक्षा कंपनीच्या माध्यमातून कामगार घेत असताना अस्तित्वातील घंटागाडीवरील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. या कामगारांना सुरक्षेची साधने पुरवली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला, तसेच योग्य मोबदलाही दिला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समीक्षा कंपनीच्या ठेक्यावर चर्चा सुरू असतानाच नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी शेख यांना थांबवत ही सभा कोरोनावरील उपाययोजनेवर असल्याची जाणीव त्यांना करून दिली. तरीही शेख याच विषयावर चर्चा करत राहिल्याने नगराध्यक्षांनी ही सभा आटोपण्याचा निर्णय घेतला. विषयांतर केले जात असल्याने कोणाच्या कोरोनासंदर्भातील सूचना असल्यास त्यांनी त्या सूचना द्याव्या, असे स्पष्ट केले. त्यावर सूचना येत नसल्याने त्वरित राष्ट्रगीत घेण्यात आले. राष्ट्रगीताला उभे राहिल्यानंतर तीन ते चार नगरसेवकांनी घाईघाईत आपल्या सूचना सभागृहात मांडल्या. त्यानंतर ही सभा गुंडाळण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांना वेळच मिळाला नाही. मुख्याधिकाºयांना कोरोना आणि त्याच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यासाठी योग्य वेळही दिला नाही. त्यामुळे राजकीय वादाचा फटका हा कोरोनाच्या बैठकीला बसला आहे.
Coronavirus : कोरोनावरील उपाययोजनेच्या बैठकीतही राजकीय हेवेदावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:14 AM