ठाणे : जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या कारागृहांत सात वर्षे व त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या तब्बल साडेतीन हजार कैद्यांची सुटका केली जाणार आहे. त्यांना त्यांच्या गावी बसगाड्यांत बसवून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी दिली. व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिष्ट्वटरच्या माध्यमातून अफवा आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.केंद्र शासनाने ठाणे जिल्ह्याचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. सर्व यंत्रणा व जनतेच्या सहकार्याने ही लढाई जिंकायची आहे, असे सांगत गर्दी टाळणे, संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. गरजू व रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.यावेळी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी केलेल्या कामगिरीबद्दल देशमुख यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले. लॉकडाउनच्या काळात सायबर क्राइमचे प्रमाण वाढले आहे. याबाबत कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिसांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या खबरदारीची माहिती दिली. परराज्यांतील मजुरांच्या प्रवासासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.मजुरांसाठी केलेल्या व्यवस्थेबद्दल कौतुकलॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना आणि बंदोबस्त करताना व्यस्त पोलिसांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. परराज्यांतील मजुरांच्या प्रवासासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या काटेकोर नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या ठिकाणी प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबतही गृहमंत्र्यांनी जिल्हा यंत्रणेचे अभिनंदन केले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कोरोनाची स्थिती, प्रशासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची यावेळी माहिती दिली.
coronavirus: साडेतीन हजार कैद्यांची होणार लवकरच सुटका, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 3:43 AM