ठाणे - ठाणे शहरात एकीकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे आता मृतांच्या आकड्यात ही भर पडू लागली आहे. मंगळवारपर्यंत ठाण्यात कोरोना मुळे सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यात आज आणखी तिघांची भर पडली आहे. कळव्यातील तिघांचा आज मृत्यू झाला आहे. या तिघांचे अहवाल येणे येणे अद्याप बाकी आहे, मात्र त्यांना महापालिकेच्या कळवा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यामुळे पालिकेने या तिघांची नोंद सध्या कोरणा संशयित मृत्यू म्हणून केली आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये एक महिला आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे. या तिघांचे वय साठ वर्षांच्या पुढील असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.मंगळवारी रात्री कळव्याच्या विविध ठिकाणावरून हे तिघेही ही महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल झाले होते. यातील तिघांनाही श्वसनाचा त्रास, एकाला अर्धांगवायूचा त्रास आणि कोरोनाची काही लक्षण आढळून आले आहेत. दरम्यान उपचारासाठी दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कळवे करांसाठी ही आता चिंतेची बाब ठरली आहे.