कल्याण : राज्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी प्रसिद्धिमाध्यमांना देताना कल्याणमधील रुग्णांची संख्या तीनवर पोहोचल्याचे सांगितले. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण मुंबईत उपचार घेत असले तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेने रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयांत विशेष व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या धर्तीवर रविवारी परिपत्रक जारी करून सूचनांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने केडीएमसीच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच बेडचे विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. आपत्कालीन नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आले आहेत. तीन सत्रांत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावलेल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याच्या नजीकच्या परिसराची पाहणी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व तसेच अंगणवाडीसेविकांची मदत घेण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.कोरोनाबाबत घाबरून जाण्याचे कारण नाही. मदतीसाठी महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयांत संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य विभागाने केले आहे.दरम्यान, परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांना कोरोनाची प्रामुख्याने बाधा झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. अशा प्रवाशाने १४ दिवसांच्या कालावधीसाठी आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार स्वत:च्या घरात विलगीकरण करून राहणे बंधनकारक राहील.केंद्र सरकारच्या विलगीकरणासंबंधीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन न केल्यास अशा रुग्णांना राज्य सरकारने कार्यान्वित केलेल्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात येईल.महापालिका क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती, संस्था तसेच संघटना यांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ते दंडनीय कारवाईस पात्र राहतील, असे परिपत्रक केडीएमसीने जारी केले आहे.महासभेवरही सावटकोरोनामुळे २० आणि २३ मार्चला होणाºया केडीएमसीच्या महासभा रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत. महापालिकेचे १२७ नगरसेवक आहेत, तर अधिकारी आणि कर्मचाºयांची महासभेला उपस्थिती ६० ते ७० च्या आसपास असते. तसेच पत्रकारांसह नागरिकही सभेला हजर असल्याने त्यांची संख्याही ५० ते ६० इतकी असते.एकीकडे गर्दी टाळण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या असल्याने होणाºया महासभाही रद्द होतील, अशी दाट शक्यता आहे. २० मार्चला नियमित मासिक तर २३ मार्चला अर्थसंकल्पीय महासभा आहे. परंतु, कोरोनाच्या रूपाने राष्ट्रीय आपत्ती आली असल्याने महासभा पुढे ढकलल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.जनतादरबार बंद : दरसोमवारी नागरिकांची गाºहाणी, तक्रारी समजून घेऊन त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाºयांना आदेशित करून तक्रारींचा निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून केडीएमसी आयुक्तांच्या दालनात दुपारी ३ ते संध्याकाळी ५ या कालावधीत जनतादरबार होत होता. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तो सध्या पुढील आदेश येईपर्यंत बंद केल्याची माहिती केडीएमसीने दिली आहे.
Coronavirus : कल्याणमध्ये तीन रुग्ण : मुंबईत उपचार; केडीएमसीने घेतली खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 1:17 AM