ठाणे : अनलॉक-१ नंतर ठाण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने कंटेनमेंट झोनबरोबरच संपूर्ण ठाणे शहरात सोमवारपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. हॉटस्पॉटमध्ये पूर्णपणे कडक निर्बंध लावणार असून येथील नागरिकांच्या येण्याजाण्यावरही निर्बंध येण्याची चिन्हे आहेत. पोलिसांबरोबर चर्चा करून हॉटस्पॉट जाहीर केले जातील, असे प्रशासनाने सांगितले. परिस्थिती बघून लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची जबाबदारी संबंधित सहायक आयुक्तांवर दिली असून सोमवारी अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.
ठाण्यात शुक्रवारी ३६५ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळेच शहरात लॉकडाऊनचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. मुंब्रा येथे तीन हॉटस्पॉट जाहीर केले असून तेथे बॅरिकेड्स लावले आहेत. पोलीसही तैनात केल्याची माहिती सहायक आयुक्त महेश आहेर यांनी दिली.विनाकारण भटकणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवणारकेडीएमसी हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शुक्रवार रात्रीपासून शनिवारी दिवसभरात ३७ प्रभागांतील कंटेनमेंट झोन सील करण्यात आले आहेत. या झोनमध्ये औषधे व अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण भटकणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
आयुक्त सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी शनिवारी कल्याणमधील जोशीबाग, रामबाग व डोंबिवलीतील कंटेनमेंट झोनची पाहणी करत तेथे केलेल्या उपाययोजना व खबरदारीची माहिती घेतली. सूर्यवंशी म्हणाले की, ‘कंटेनमेंट झोनमधील वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी स्थानिक नगरसेवक व प्रत्येक प्रभागांतील कोरोना समितीची मदत घेतली जाईल. अनलॉकमध्ये नागरिकांचा एकमेकांशी संपर्क वाढल्याने कोरोना रुग्णवाढीचा दर दुप्पट झाला आहे. सध्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या पाच हजार असून, ती १५ जुलैपर्यंत २० हजारांच्या घरात पोहोचण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय समितीनेही हा अंदाज व्यक्त वर्तवला आहे. मात्र, २० हजारांमधील ७० टक्के रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले असतील.’
ते पुढे म्हणाले, सध्या केडीएमसीची सहा ते सात हजार खाटांची क्षमता आहे. तरीही वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक प्रभागांत ३०० खाटांची व्यवस्था करण्याचे आदेश प्रत्येक प्रभाग अधिकाºयास दिले आहेत. सध्या ३७ प्रभागांतील कंटेनमेंट झोन सील केले असले तरी रुग्ण संख्या वाढीनुसार कंटेनमेंट झोनची संख्या वाढवली जाऊ शकते. दरम्यान, नागरिकांनी ताप आला तरी त्यांनी रुग्णालयात येऊन तपासणी केली पाहिजे. आजही असंख्य लोक रुग्णालयात तापसणीसाठी येणे टाळत आहेत. तसे नागरिकांनी करू नये.’