कल्याण : कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह असताना एका महिलेला तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगून तिच्यावर कोरोनाचे उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे, ही बाब महिलेच्या नातेवाइकांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी रुग्णालय व लॅबविरोधात कारवाई करण्याची मागणी केली असून, पोलिसांत तक्रारही दिली आहे.नीता सावंत (३४, रा. आधारवाडी परिसर) यांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी झाल्याने त्यांना सिटी रुग्णालयात ३ जूनला दाखल करण्यात आले. तेथे त्यांची ४ जूनला कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी ए अॅण्ड जी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नीता यांना आॅक्सिजन लावला गेला. तर, त्यांचा भाऊ अजय सावंत यांना ४५ हजार रुपयांचे इंजेक्शन आणण्यास सांगितले. तसेच ३६ हजारांची सहा इंजेक्शन मागविण्यात आली. ४५ हजारांचे इंजेक्शन तसेच ३६ हजारांच्या सहा इंजेक्शनपैकी तीन दिली गेली. पुन्हा ४५ हजारांचे दुसरे इंजेक्शन लागेल, असे सांगण्यात आले. तेव्हा अजय यांनी इंजेक्शनसाठी मुंबईला धाव घेतली. तेथे कोरोना टेस्टचा रिपोर्ट असल्याशिवाय इंजेक्शन दिले जाणार नाही, असे औषधविक्रेत्याने सांगितले. अजय यांनी नीताचे आधारकार्ड व रिपोर्ट त्याला देताच त्याने हा रिपोर्ट नीता यांचा नाही. त्यांचे वय या ठिकाणी जुळत नाही. हा रिपोर्ट ४४ वर्षांच्या नीता यांचा असल्याचे सांगितले. त्यामुळे अजय यांनी रुग्णालय व लॅबकडे चौकशी केली असता, त्यांच्या बहिणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, तर ४४ वर्षीय नीता सावंत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. केवळ नावात साधर्म्य असल्याने हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.अजय यांच्या बहिणीवर कोरोनाचे उपचार केले होते. तिच्या आरोग्यावर हेव्ही इंजेक्शनचा दुष्परिमाण झाला असावा, या भीतीने बहिणीला त्यांनी मीरा रुग्णालयात दाखल केले आहे. ज्या नीता सावंत (४४) यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, त्यांची चाचणी ३० जूनला घेतली गेली होती. तसेच त्यांच्यावर गोडबोले रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, अजय यांच्या बहिणीच्या उपचारावर आतापर्यंत दीड लाखापेक्षा जास्त खर्च झाला आहे. मीरा रुग्णालयाचे बिलही त्यांना भरावे लागणार आहे. याप्रकरणी अजय यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती झाली नाही. अखेर, त्यांनी वैद्यकीय अधिकारी सुरेश कदम यांची भेट घेऊन लॅब व रुग्णालयाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यातही तक्रार दिली आहे.‘ही लॅबची चूक’यासंदर्भात सिटी रुग्णालयाचे डॉ. तुषार जैन म्हणाले की, ‘नीता सावंत यांना खोकला, अशक्तपणा व छातीत कफ होता. त्यांच्या रक्ताच्या चाचण्या करून तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांची कोरोना चाचणीही केली. मात्र, लॅबमध्ये एकाच नावाच्या दोन रुग्णांचे रिपोर्ट होते. नाव सारखे असल्याने हा गोंधळ झाला. ही चूक लॅबची आहे.’‘संबंधितांवर होणार कारवाई’केडीएमसीतील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले की, नीता सावंत यांच्या भावाने निवेदन दिले आहे. याप्रकरणी शहानिशा करून संबंधितांच्या विरोधात कारवाई केली जाईल.
coronavirus: धक्कादायक! बाधा नसताना महिलेवर केले कोरोनाचे उपचार, चुकीच्या उपचारांमुळे आरोग्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 12:02 AM