लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : डोंबिवलीमध्ये परदेशातून आलेला तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असतानाच ठाणे मध्ये देखील परदेशातुन आलेले ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या ४ जणांचे नमुने रविवारी तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. त्याना पालिकेने आता विलगीकरण केंद्रात ठेवले आहे.
हे चारही जण २८ नोव्हेंबर रोजी परदेशातून ठाण्यात आले होते. यावेळी त्यांची कोणत्याही प्रकारची कोरोना चाचणी एअरपोर्टवर करण्यात आली नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. परंतु आता महापालिकेच्या माध्यमातून परदेशातून आलेल्या नागरिकांची यादी तपासली जात असताना या चार जणांची माहिती पुढे आली. त्यानंतर त्या चौघांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यामध्ये हे चौघेही पॉझिटिव्ह आल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे.
यातील तिघेजण एकाच कुटुंबातील असून ते तिघेही नेदरलँडवरून २८ नोव्हेंबरला ठाण्यात आले होते. तर अन्य एक जण हे कॅनडातून ठाण्यात आले होते. अशी माहिती देखील पालिकेने दिली आहे. आता त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी त्यांचे नमुने रविवारी पुणे येथे पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.