डोंबिवली: केंद्र सरकारच्या नॅशनल अर्बन हेल्थ मिशन या योजनेंतर्गत ५कोटी रुपयांचा निधी २०१६ मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत जमा झाले. त्यानूसार महापालिकेने चांगले हॉस्पिटल बांधायचे ठरवले, पण काही लोकांनी त्यात मोडता घालून पीपीपी तत्वावर सूतिकागृह बांधायचे ठरवल्याची टीका आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली. त्यात आता महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत असून महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कलम ६७ क अन्वये तो कोट्यवधींचा निधी वापरून शास्त्रीनगर रुग्णालय सुसज्ज करावे, असे पत्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिले आहे.आरोग्य विषयक आणीबाणी असल्याने तो निधी त्या हॉस्पिटलासाठी वापरावा असे त्यांचे म्हणणे आहे. सुतिकागृहासाठी ४ वर्षांनी का होईना फेब्रुवारी महिन्याअखेरीस नुकताच एक प्रस्ताव आला असून त्यासाठीच्या निविदेला प्रतिसाद मिळाला आहे. परंतू त्यास २० दिवस होत नाही तोच लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे आता त्यासाठी निधीची गरज नसून तो निधी शास्त्रीनगर रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी वापरावा असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.गेल्या चार वर्षापासून निधी आला असेल तर तो पडून का राहिला? त्याला खोडा कोणी घातला? आणि २ जिल्ह्यांचे तत्कालीन पालकमंत्री, राज्यमंत्री आणि महापालिकेच्या सत्तेचे भागिदार असलेल्या आमदार रवींद्र चव्हाण, आणि भाजपचे ते अपयश नाही का? त्यांनी निधी येऊनही सुतिकागृह म्हणा अथवा अद्ययावत हॉस्पिटलची सुविधा का देऊ केली नाही? असा सवाल मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केला. आमदार चव्हाण यांच्या पत्रावर टिका करतांना ते म्हणाल की, बैल गेला आणि झोपा केला अशीच काहीशी अवस्था या पत्रामुळे झाली आहे. ५ कोटी चार वर्षांपासून आले असतील तर त्याचे व्याजही धरणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सूतिकागृहाची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असून त्या जागी मॉल होणार होता तो प्रयत्न मनसेने २०१० मध्ये हाणून पाडला. जेथे आता अत्रे वाचनालय आहे तेथेदेखील गाळे काढण्याचा मनसुबा होता तो देखील हाणून पाडला. हे सगळ नियोजन खोडा घालणा-या मंडळींचेच होते. प्रत्येक प्रकल्पात फायदा करून घ्यायच्याच मागे ते असतात असा टोलाही त्यांनी लगावला. सोशल मीडियावर त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले.
Coronavirus : शास्त्रीनगर रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी ‘तो’ ५ कोटींचा निधी वापरा; आमदार रवींद्र चव्हाणांचे आयुक्तांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 4:44 PM