- स्नेहा पावसकरठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता एकीकडे महापालिका कडक लॉकडाऊन करत आहे, तर दुसरीकडे हातावर पोट असलेल्यांना जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. यापूर्वी अनेकांनी आपले मूळ व्यवसाय बंद असल्याने भाजीपाला विक्रीकडे मोर्चा वळवला होता. मात्र, २ जुलैपासून ठाण्यात पुन्हा केलेल्या लॉकडाऊनदरम्यान भाजीपाला विक्रीलाही परवानगी नसल्याने पोटापाण्यासाठी कोणता व्यवसाय करायचा? खायचे काय आणि जगायचे कसे? असा प्रश्न अनेक सामान्य चेहऱ्यांवर दिसत आहे.कोरोनामुळे अनेक बड्या उद्योगधंद्यांची आर्थिक गणिते बिघडली, तिथे सामान्यांची गोष्टच निराळी. त्यातही ठाणे-मुंबईसारख्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊनही वाढतच चालला आहे. परिणामी रिक्षा, टॅक्सी, स्रॅक्स कॉर्नर, पिठाच्या गिरण्या, चहाच्या टपºया असे छोटेछोटे व्यवसाय तर पूर्णत: बंद आहेत.त्यामुळे या छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी रोजगारासाठी फळे, भाज्या विक्री सुरू केले होते. इतकेच नव्हे तर कंत्राटी पद्धतीत काम करणारे आणि सध्या हाताला काम नसणारे, अनेक खाजगी कार्यालये बंद असल्याने रोजगार नसलेल्या अनेकांनी भाजीपाला विक्रीचा पर्यायनिवडला होता.आपापल्या परिसरात जागा मिळेल तिथे छोटे टेबल टाकून ते भाजीपाला विक्री करत असत. मात्र, २ जुलैपासून ठाण्यात सुरू झालेल्या कडक लॉकडाऊनमध्ये धान्य, भाजीपाला विक्रीवरही बंदी घातली आहे. त्यामुळे भाजीविक्रीतून मिळणारा थोडाफार आधारही मिळेनासा झालाय. रोजगारासाठी दुसरा पर्यायच उपलब्ध नसल्याने अनेकांसमोर जगायचं कसं, खायचं काय? कुटुंब सांभाळण्यासाठी आता कोणता व्यवसाय करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही काही जण छुप्या पद्धतीने घरात भाजीची साठवणूक करून मागील दाराआडून, खिडकीतून विक्री करतात.मात्र अपेक्षित गिºहाईक येत नसल्याने भाजी पडून राहते आणि खराब होऊन नुकसानदेखील होते. त्यातच पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे कर्मचारी त्यात्या परिसरात गस्त घालत असल्याने भीतीही वाटते, पण पोटापाण्यासाठी काही तरी करावे लागते, असे मत एका रिक्षाचालकाने व्यक्त केले.
coronavirus: भाजीविक्रीलाही बंदी, आता पोटापाण्यासाठी करायचे तरी काय? हातावरच्या पोटाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 1:59 AM