ठाणे : ठाणे जिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून दाखल झाल्यावर तेथे एका बालकाला जन्म देणाऱ्या ठाण्यातील त्या मातेसह २५ जण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले. या नवजात बालकाचे त्याच्या घरातील मंडळींनी जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. अशाप्रकारे एखाद्या बालकाचे स्वागत होण्याची जिल्ह्यातील पहिली- वहिली वेळ असावी, अशी माहिती सूत्रांनी दिली.ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोरोना विशेष रुग्णालय म्हणून घोषित झाल्यापासून आतापर्यंत ४९८ रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील रुग्णांसह वसई-विरार आणि पालघर येथील रुग्णांचा समावेश आहे. यात दोन महिलांची प्रसूती झाली आहे. तर तीन रुग्णांवर डायलेसिसचे उपचार करण्यात आले आहे. तर १२९ रुग्णांना इतर रुग्णालयात हलवले आहे. तर गुरुवारपर्यंत १५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून १८५ जणांवर उपचार सुरू असून २० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.एकीकडे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत असताना, नव्या नियमावलीनुसार जे रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. त्यांना घरी सोडले जात आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल २५ रुग्ण कोरोनामुक्त होत घरी परतले आहेत. यामध्ये २० जण ठाणे तर ५ जण हे कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीतील आहेत.८ मे रोजी इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या एका २७ वर्षीय महिलेला उपचारार्थ दाखल केले होते. त्यातच ती गर्भवती होती. शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास तिची प्रसूती झाली. तिने मुलाला जन्म दिला असून ही कोविड १० पॉझिटिव्ह रुग्ण महिलेची जिल्ह्यातील दुसरी प्रसूती ठरली होती. आता तिचे रिपोर्ट नॉर्मल आल्यावर मातेसह बाळाला घरी सोडले.
coronavirus: कोरोनामुक्त मातेसह नवजात बालकाचे जोरदार स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 3:18 AM