टिटवाळा : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागांत सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, त्यांना इतर रुग्णालयांत दाखल करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी वरप येथील राधास्वामी सत्संगच्या प्रशस्त जागेवर कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. त्याचे काम प्रगतिपथावर सुरू असून, ते १० जुलैला सुरू होणार असल्याची माहिती कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी दिली.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हारळमध्ये ४८, वरप १०, कांबा, पावशेपाडा, केळणी, भिसोळ, बेहरे, नडगाव, पळसोली, कोसले, राया आणि कोंढेरी येथे प्रत्येकी एक, वाहोली, गोवेली- रेवती, वेहेळे, गुरवली येथे प्रत्येकी दोन, घोटसई तीन, फळेगावात चार कोरोनाचे रुग्ण आहेत. म्हारळ येथील एकाच घरात १० ते ११ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. वरप येथेही रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागांतील रुग्णांना कल्याण, भिवंडी किंवा इतर ठिकाणच्या रुग्णालयांत दाखल करून घेतले जात नाही. तेथे खाटा नसल्याचे सांगितले जात आहे. तहसीलदार आकडे, कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्वेता पालवे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खामकर, माजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर मोरे, डॉ. योगेश कापूसकर, लोकप्रतिनिधी व पत्रकार यांच्या पाठपुराव्यामुळे वरप येथील राधास्वामी सत्संग येथील जागेवर २०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले जात आहे. या सेंटरसाठी स्टाफ तयार असल्याचे नोडलआॅफिसर डॉ. योगेश कापूसकर यांनी सांगितले.आयुक्तांकडून क्वारंटाइन सेंटरसाठी विनायक हॉलची पाहणीकल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रत्येक प्रभागात क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी आयुक्तांनी आवाहन केले आहे. त्याला शिवसेना नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी प्रतिसाद देत त्यांच्या बैलबाजार परिसरातील विनायक मंगल हॉलमध्ये १०० बेडचे क्वारंटाइन सेंटर सुरू करण्यास पुढाकार घेतला आहे. या हॉलची पाहणी मंगळवारी सकाळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली.आयुक्तांनी प्रत्येक प्रभागात ३०० बेडची सुविधा असलेले क्वारंटाइन सेंटर उभारण्याचे आदेश प्रत्येक प्रभाग क्षेत्र अधिकाºयास दिले आहेत. याबाबत पेणकर यांनी पुढाकार घेऊ न विनायक हॉलमध्ये १०० बेडच्या क्वारंटाइन सेंटरची उभारणी केली जाऊ शकते, असे आयुक्तांना सुचवले होते. आयुक्तांनी या हॉलची पाहणी करून त्याला हिरवा कंदील दर्शवला आहे.या वेळी आयुक्त म्हणाले की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पंधरा दिवसांत एक हजार बेड उपलब्ध करून देण्यासाठी डोंबिवली, कल्याणमध्ये डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू केले जाणार आहेत. सध्या महापालिका हद्दीत ८०० चाचण्या केल्या जात आहेत. त्या दिवसाला दोन हजार करण्यात येणार आहेत. चाचणी केल्यानंतर अहवाल येईपर्यंत संबंधित रुग्णाला क्वारंटाइन करावे लागते.
coronavirus: वरपमधील कोविड केअर सेंटरचे काम प्रगतिपथावर, ग्रामीण भागांतील रुग्णांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 1:37 AM