नितिन पंडीत
भिवंडी- सध्याच्या लॉकडाऊन व संचारबंदी काळात भिवंडी शहरात सर्व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत असतानाच , शहरातील तिनबत्ती भाजीमार्केट येथे दररोज हजारो नागरीक भाजी खरेदीच्या बहाण्याने सामाजिक अंतर न बाळगता गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले असून नागरीक समजावून ऐकत नसल्याने महापालिकेने अखेर तिनबत्ती येथील घाऊक व किरकोळ भाजी विक्री येत्या 14 एप्रिल पर्यंत बंद करीत असल्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील तिनबत्ती भाजी मार्केट मध्ये सकाळच्या सुमारास घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसोबत नागरीक तोंडावर मास्क न लावता गर्दी करीत असल्याने करोना विषाणूचा प्रादुर्भाव फैलावण्याची भीती व्यक्त केली जात होती त्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर ही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने महानगरपालिका प्रशासनास अखेर भाजीमार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला .
दरम्यान शहरातील घाऊक भाजी विक्रेत्यांनी पोगाव येथील नियोजित जागेवर खरेदी व्यवहार करून तो किरकोळ विक्रेत्यांना विक्री केल्यावर संबंधित किरकोळ विक्रेत्यास त्यांच्या प्रभागात जाण्यासाठी फक्त भाजीविक्रेते म्हणून ओळखपत्र दिले जाणार असून त्यांनी विक्री परिसरात सामाजिक अंतर बाळगत आपला व्यवसाय करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक असल्याचं आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे .