उल्हासनगर : शिक्षण मंडळातील साहित्य खरेदीसाठी भरलेला ठेका मागे घ्यावा म्हणून उल्हासनगर पालिकेत बोलावून भाजपाच्या स्वीकृत नगरसेवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी उल्हासनगरात घडली. मारहाण करणारा ठेकेदार शिवसेनेशी संबंधित असल्याने या संघर्षाला वेगळे वळण लागले आहे. ठेकेदाराने पोटाला चाकू लावल्याचा दावा भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी केला, तर ठेकेदार सत्यवान जगताप यांनी रामचंदानी यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दोघांची जबानी घेतली आहे. त्यांच्यावर मध्यवर्ती रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय डोळस यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, रामचंदानी यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे नेणार असल्याचे आणि गेल्या आठ वर्षांतील घोटाळ््याची चौकशी करण्याचा आग्रह धरणार असल्याचे सांगितले. ठेकेदार सुनील पिंपळे यांनी स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना सकाळी फोन करून महापालिकेत भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार पालिकेत येऊन ते पालिका सचिव प्रतिभा कुलकर्णी यांच्या दालनात स्वीकृत नगरसेवकाच्या नियुक्तीचे पत्र घेण्यास गेले. तेव्हा पिंपळे यांनी तेथे येऊन त्यांना बाहेर भेटण्यासाठी बोलावले. तेथे अन्य ठेकेदार सत्यवान जगताप, पिंपळे आणि पिंट्या यांनी त्यांना स्थायी समितीच्या सभागृहात नेले. त्याचे दार आतून बंद केले. त्यातील एकाने पोटाला चाकू लावून शिक्षण मंडळाच्या शाळा बांधणीसाठी रामचंदानी यांच्या मुलाने भरलेली निविदा मागे घेण्यास सांगितले. ते न ऐकल्याने तिघांनी मारहाण केली. त्यानंतर घाबरलेल्या स्थितीत मी मध्यवर्ती पोलीस गाठल्याची माहिती रामचंदानी यांनी दिली. मात्र रामचंदानी बनाव करीत असून त्यांनीच आम्हाला बोलावून जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केल्याचा प्रत्यारोप ठेकेदार जगताप यांनी केला. अन्य ठेकेदार पिंपळे व पिंटया यांच्याशी संपर्क झाला नाही. रामचंदानी व जगताप यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोघांची जबानी घेतली आहे. तसेच पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांना भेटून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रिकरण ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची तसेच शिक्षण मंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करणार असल्याचे आयुक्त सुधाकर शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालिकेत नगरसेवकाला ठेकेदाराने बदडले
By admin | Published: April 29, 2017 1:41 AM