ठाणे : ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे; परंतु तिसरी लाट केव्हाही येण्याची शक्यता असल्याने त्याची तयारी पालिकेने आधीपासूनच करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेने तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑक्सिजनसह विविध प्रकारच्या साहित्य खरेदीचा प्रस्ताव शुक्रवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. त्यामध्ये ऑक्सिजन आणि सिलिंडरच्या खरेदीसाठी १० कोटी ५१ लाख रुपये, तर लिक्विड ऑक्सिजन पुरविण्याच्या वाढीव खर्चापोटी पाच कोटी १५ लाख असा मिळून १५ कोटी ६६ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसल्याने प्रशासनाकडून भरीव तरतूद करण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये शहरात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. ऑक्सिजन उपलब्ध करताना महापालिकेची पुरती दमछाक झाली होती. आता ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी आता आरोग्य विभागाने खरेदीचे पाच वेगवेगळे प्रस्ताव तयार केले आहेत. आरोग्य विभागाच्या पहिल्या प्रस्तावामध्ये १० लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन (१०० नग) खरेदी करण्यात येणार आहे. हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना या उपकरणाच्या माध्यमातून ऑक्सिजन देणे शक्य होणार आहे. यामध्ये डायग्नोफार्मा या कंपनीने हे मशीन पुरविण्याची तयारी दर्शविली असून, यासाठी महापालिकेला ७९ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
दुसऱ्या प्रस्तावामध्ये इनॉक्स एअर प्राडक्ट कंपनीच्या माध्यमातून ग्लोबल हॉस्पिटल आणि कौसा कोविड हॉस्पिटलमध्ये लिक्विड ऑक्सिजनची खरेदी करण्यात येणार आहे. या कंपनीने दिलेल्या दरानुसार प्रतिदिवस १६ मेट्रिक टनांसाठी अंदाजे २ कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये तीन महिन्यांकरिता अंदाजे २ कोटी ६३ लाख, तर कौसा रुग्णालयात तीन दिवसांतून एकदा पुरवठा करण्यासाठी ८७ लाख ८४ हजार असा एकूण तीन कोटी ५१ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
दुसरीकडे, महापालिकेच्या चार रुग्णालयांमध्ये सरासरी एक हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना वेळेत ऑक्सिजन देणे कठीण होण्याची शक्यता आहे. यासाठी स्वत:च्या मालकीचे ड्यूरा खरेदी केल्यास वितरकांकडून ऑक्सिजन भरून घेणे शक्य होणार आहे. स्वत:च्या मालकीच्या सिलिंडरमध्येदेखील ऑक्सिजन भरणे शक्य असल्याने ४५० लिटर क्षमता असलेले १० ड्यूरा तसेच विविध प्रकारचे सिलिंडर खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी रायगड गॅस इंडिया प्रा. लि. या कंपनीला एक कोटी ३३ लाख रुपये अदा करावे लागणार आहेत. दुसऱ्या एका प्रस्तावात २४७ क्षमतेचे ५० ड्यूरा ऑक्सिजन सिलिंडर, २०८ लिटर क्षमतेचे ५०, तसेच २०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी करण्यात येणार असून यासाठी पालिकेला ३ कोटी १८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. आणखी एका कंपनीकडून एक कोटी ७८ लाखांचा लिक्विड ऑक्सिजन खरेदी करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
.........
ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ
महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठ्यात वाढ होत आहे. पहिल्या लाटेत ड्यूरा सिलिंडरच्या माध्यमातून आवश्यक प्रेशर आणि फ्लो मिळत नसल्याने लिक्विड ऑक्सिजनसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढल्याने लिक्विड ऑक्सिजन खरेदीसाठीचे एक कोटी ७८ लाख ३५ दिवसांत खर्च करण्यात आले. त्यामुळे पुढील चार महिन्यांमध्ये १४,७३,०१७ क्युबिक मीटरसाठी पाच कोटी ५५ लाख इतका वाढीव खर्च अपेक्षित असून, तो महासभेच्या मान्यतेसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे.