लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान भाजपा नगरसेविकेसह तिच्या मुलाला भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना भार्इंदर पश्चिमेस घडली. भार्इंदर पोलीस ठाण्यात परस्पर फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भार्इंदर पश्चिमेस नव्या प्रभाग ७ मधील अण्णानगरमधील समाज मंदिराच्या नूतनीकरणाचे काम आ. नरेंद्र मेहता यांच्या निधीतून मंजूर झाले. त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रविवारी होता. स्थानिक नगरसेविका प्रतिभा तांगडे-पाटील यांच्यासह या प्रभागातून भाजपाचे इच्छुक नगरसेवक अॅड. रवी व्यास आदी उपस्थित होते. मेहता आल्यावर भाजपाचे काही कार्यकर्ते व रहिवाशांनी मेहतांकडे येऊन स्थानिक नगरसेविकेने कामेच केलेली नाहीत. त्या येथे फिरकल्याही नाहीत, असा तक्रारींचा सूर लावला. त्यावर आपण प्रभागात कामे केली असून स्थानिकांसोबत छायाचित्रेही आहेत, असे तांगडे-पाटील म्हणाल्या. दरम्यान, तुमची कामे असतील तर मला सांगा, असे नागरिकांना सांगून कार्यक्रम आटोपता घेत मेहता निघून गेले. नगरसेविका प्रतिभा, मुलगा शुभम हे थांबले होते. शुभमने भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी वासुदेव हरिजन (२७) याला आईने काम करूनही तू असे का बोलला, अशी विचारणा केली असता वाद झाला. ते पाहून वासुदेवचे अन्य सहकाऱ्यांनी धावून येत शुभमला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात नगरसेविका पाटील यांनाही धक्काबुक्की झाली. पक्षांतर्गत चाललेला राडा पाहून अॅड. व्यास व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेत शुभमला सोडवले.प्रतिभा पाटील पुन्हा इच्छुकरोहिणी कदम, दीपाली मोकाशी, माजी नगरसेविका सुधा व्यास, निर्मला माखिजा, रितू कोळी इच्छुक आहेत. पाटील या स्थानिक नगरसेविका असून त्याही इच्छुक आहेत. महिलांचे दोन्ही प्रभाग खुल्या प्रवर्गातील असल्याने त्या राहत असलेल्या प्रभाग ८ मधून उमेदवारी देण्याची स्थानिक नेतृत्वाची तयारी आहे. तसेच या प्रभागातून नगरसेवक मॉरस रॉड्रिक्स व रवी व्यास यांची भाजपाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
नगरसेविकेला मारहाण
By admin | Published: May 29, 2017 6:18 AM