मीरा रोड : अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी १० हजारांची लाच घेताना शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर याच्यासह मध्यस्थास पकडून देणा-या तक्रारदार रामप्रसाद वासुदेव प्रजापती यांचे वाढीव बेकायदा बांधकाम बुधवारी मोठ्या फौजफाट्यासह महापालिकेने तोडले. यावेळी आजूबाजूच्या अनेक वाढीव बांधकामांना हातदेखील न लावता एकट्या प्रजापतीचेच बांधकाम तोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.काशिमीरा येथील मुंशी कंपाउंडमध्ये महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वरदहस्ताने बेकायदा बांधकामे होत आहेत. परंतु, या बांधकामांवर कारवाई करण्यासह त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास पालिकच्या प्रभाग अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करतात. या बांधकामांच्या आड मोठा आर्थिक गैरव्यवहार चालत असल्याचे नगरसेवक भोईर याच्या अटकेने स्पष्ट झाले आहे. त्याच्या कोठडीत गुरुवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे.मुंशी कंपाउंडमध्ये राहणारे प्रजापती यांनी अन्य लोकांनी मजले वाढवले म्हणून आपल्याही घरावर एक मजला बांधण्यास घेतला होता. परंतु, नगरसेवक भोईर याने प्रभाग अधिकाºयास तक्रार करुन बांधकाम तोडायला लावेन असा दम देत प्रजापतीला २५ हजार रुपयांची मागणी केली होती. प्रजापती सोमवारी रात्री भोईर याच्या कार्यालयात १० हजार रुपये घेऊन गेले असता, बाहेर उभ्या असलेल्या गोरखनाथ ठाकूर शर्मा याच्याकडे भोईरने पैसे देण्यास सांगीतले. त्यावेळी सापळा लावून असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली.दरम्यान, आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या आदेशाने बुधवारी महापालिकेचे झाडून सर्व प्रभाग अधिकारी, बाऊंसर, पोलीस असा मोठा ताफा मुंशी कंपाउंडमध्ये दाखल झाला. त्यावेळी लोकांना वाटले की, नव्याने बांधकाम सुरु असलेली व निवडणूक काळात नव्याने झालेली बेकायदा बांधकामे तोडली जातील. पण इतका मोठा ताफा केवळ प्रजापती यांच्या घरावरील अर्धवट अवस्थेत असलेले बांधकाम तोडून माघारी फिरला. प्रजापती यांच्या घराला लागून, तसेच आजूबाजूला नव्याने मोठ्या प्रमाणात वाढीव मजल्याची बांधकामे झाली असताना त्यांना पाठीशी घालत पालिकेचा ताफा निघून गेला.
नगरसेवकास पकडून देणाऱ्याचे बेकायदा बांधकाम पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:07 AM