कल्याण : केडीएमसीतील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपा नगरसेवक महेश पाटील यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नाकारल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे, अशी माहिती कुणाल पाटील यांचे वकील डी.एन. रे आणि संजय मोरे यांनी दिली.जानेवारी २०१८ मध्ये भिवंडी तालुक्यातील गणोशपुरी पोलिसांनी कॅश व्हॅन लुटल्याच्या दरोडा प्रकरणात सात जणांना अटक केली होती. तपासादरम्यान आरोपींनी कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी महेश पाटील, सुजित नलावडे आणि विजय भाकडे यांनी दिल्याची माहिती दिली. याप्रकरणी पोलीस अधिकारी व्यंकटेश आंधळे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर, महेश पाटील यांनी कल्याण न्यायालयात व उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो नामंजूर केला. महेश पाटील पोलिसांना शरण येताच त्यांना अटक झाली. दहा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर महेश पाटील यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.महेश पाटील व अन्य दोघांनी कल्याण न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता तो फेटाळण्यात आला. उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली. परंतु, तेथेही त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. पाटील जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयातही गेले. मात्र, तेथेही अर्ज नाकारल्याचे रे आणि मोरे यांनी सांगितले.
नगरसेवक महेश पाटील यांना दिलासा नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:44 AM