जितेंद्र कालेकरठाणे : पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचे राजकारण आणि गुन्हेगारीतील वाढते वर्चस्व संपवण्यासाठी तसेच विनायक कांबळे खून प्रकरणात पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने सूड आणि अन्यायाच्या भावनेतून त्यांची हत्या केल्याचा खुलासा अक्षय ऊर्फ बबलू सुरवसे आणि त्याच्या साथीदारांनी केला आहे. ठाणे खंडणीविरोधी पथकाने त्यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीतील चौकशीत ही माहिती उघड झाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.अक्षयचा साथीदार विनायक कांबळे याचा पाच वर्षांपूर्वी खून झाल्यानंतर यातील नगरसेवक संदीप पवार याच्यावर संशय असूनही स्थानिक पोलिसांकडून फारसे सहकार्य मिळाले नाही. संदीपची आई सुरेखा दिलीप पवार या विद्यमान नगरसेविका असून पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा आहेत. शिवाय, संदीप हाही नगरसेवक असल्याने एकाच घरात दोन नगरसेवक होते. त्यामुळे पवार कुटुंबीयांचे राजकारणात चांगलेच वर्चस्व होते. विनायकच्या खुनानंतर अक्षयवरही दोन ते तीन वेळा संदीपच्या टोळीने हल्ले केल्याचा आरोप आहे. संदीपचा भाऊ भय्या पवार याच्यावरही अनेक गंभीर स्वरूपांचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यालाही पंढरपुरातून तडीपार केले आहे. एकीकडे राजकारणात वर्चस्व असलेल्या संदीपचे गुन्हेगारी जगतातही चांगलेच वर्चस्व वाढले होते. त्यामुळे त्याच्या या दोन्ही ठिकाणच्या वाढत्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी त्यालाच संपवण्याची योजना अक्षय आणि त्याच्या पाच साथीदारांनी आखली. ठरल्यानुसार गुढीपाडव्याच्या दिवशीच त्याच्यावर थेट गोळीबार करून आणि चॉपरने वारही केल्याची कबुली अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी ठाणे पोलिसांना दिली आहे. पंढरपुरात संदीप पवारची हत्या केल्यानंतर ठाण्यातही पेट्रोलपंप लुटीसाठी आल्यानंतर १९ मार्च रोजी ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरातून अक्षय सुरवसे, पुंडलिक वनारे, मनोज शिरसीकर आणि भक्तराज धुमाळ (सर्व रा. पंढरपूर) या चौघांना खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकातील निरीक्षक विकास घोडके, उपनिरीक्षक विकास बाबर, अविनाश महाजन आदींच्या पथकाने अटक केली. त्यांना सात दिवस पोलीस कोठडी मिळाली असून याच चौकशीत त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, पंढरपूर पोलिसांनीही ठाणे पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे. या चारही आरोपींचा पंढरपूर पोलीस लवकरच ताबा घेतील, अशीही माहिती सूत्रांनी दिली.-
राजकारण अन् गुन्हेगारीतील वर्चस्व मोडण्यासाठी नगरसेवक संदीपचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 10:51 PM
संदीप पवार खून प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या अक्षय सुरवसे याच्यासह चौघांचाही ताबा आता पंढरपूर पोलीस लवकरच घेणार आहेत.
ठळक मुद्देविनायक कांबळे खून प्रकरणात पोलिसांचे दुर्लक्षअक्षयवरही झाला होता हल्लापंढरपूर पोलीस घेणार आरोपींचा ताबा