मीरारोड - मीरारोड पूर्वच्या क्वीनस पार्क भागात एका इमारतीच्या वीज मीटर जंक्शन मध्ये शनिवारच्या मध्यरात्री भीषण आग लागली . या आगीच्या भीतीने घाबरलेल्या व धुराच्या त्रासाने अस्वस्थ झालेल्याना स्थानिक डॉक्टर नगरसेविका प्रीती पाटील यांनी तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरवत उपचार केले.
येथील ए - ७ ह्या इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या वीज मीटरच्या जंक्शनला शुक्रवारच्या मध्यरात्री नंतर १२ . ०५ च्या सुमारास आग लागली . अनेकजण झोपेत असताना लागलेल्या आगीने एकच गोंधळ उडून घबराट माजली . रहिवाश्यांनी अग्निशमन दलास कळवले तसेच स्थानिक नगरसेविका डॉक्टर प्रीती पाटील यांना माहिती दिली. अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी येऊन आग विझविण्याचा प्रयत्न करू लागले . आग लागल्याने पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील रहिवाश्याना बाहेर काढण्यात आले तर तिसऱ्या व चौथ्या मजल्या वरील रहिवाश्याना इमारतीच्या गच्चीवर जाण्यास सांगण्यात आले . अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. परंतु वीज मीटर जंक्शन जाळून खाक झाल्याने वीज पुरवठा बंद झाला होता.
आगीची माहिती मिळताच खारीगावात राहणाऱ्या नगरसेविका डॉक्टर प्रीती पाटील ह्या वैद्यकीय पथकासह घटनास्थळी धावून आल्या. आग लागल्याने घबराट माजून गोंधळ उडाल्याने इमारतीतील वृद्ध , महिला , मुलं आदी घाबरलेली होती. काहींना धुराचा त्रास झाला होता. वीज नसल्याने मोबाईल आदींच्या उजेडात डॉ . प्रीती यांनी तात्काळ प्राथमिक उपचार सुरु केले . त्यांना धीर दिला . रक्तदाब , ऑक्सिजन लेव्हल आदी तपासणी केली गेली. सुदैवाने यात कोणी जखमी वा जीवित हानी झाली नाही . शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे.