उल्हासनगर : प्रभागातील पाणीटंचाईच्या निषेधार्थ नगरसेवक राजू व सोनिया जग्यासी या दाम्पत्याने आयुक्तांकडे राजीनामा दिला आहे. उपोषण करूनही पाणी मिळत नसल्याने नगरसेवक पदाचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित करत कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांच्या हटावची मागणी त्यांनी केली आहे. उल्हासनगर कॅम्प नं-३, कंवरराम पुतळा व चांदीबाई कॉलेज परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याची माहिती पालिका आयुक्त मनोहर हिरे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांना देवून उपोषणाचा इशारा दिला तरीही समस्या न सुटल्याने नगरसेवक जग्यासी दाम्पत्यांने गेल्या आठवड्यात पालिका जलकुंभाखाली उपोषण सुरू केले. आयुक्तांनी पाणीपुरवठयाचे आश्वासन दिल्यावर उपोषण सोडले होते. मात्र पाणीटंचाई जैसे थै राहिल्याने अखेर त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्त कार्यालयात दिला आहे. आयुक्त हिरे हे नागपूर अधिवेशनात असून ते बुधवारी पालिकेत येणार आहेत. त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
नगरसेवक दाम्पत्याचा पाण्यासाठी राजीनामा
By admin | Published: December 16, 2015 2:05 AM